‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातून अभिनेता अंशुमन विचारे घराघरांत लोकप्रिय झाला. नाटक व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत त्याने मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. अंशुमनने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात प्रवास करताना आपण अनेकदा गोंधळून जातो. विशेषत: गर्दीतून प्रवास करताना अनेक वस्तू गहाळ होण्याची किंवा गडबडीत विसरण्याची शक्यता असते. असाच काहीसा अनुभव अंशुमनला आला. प्रवासादरम्यान नुकताच त्याचा मोबाइल फोन पडला. परंतु, एका भल्या रिक्षा चालकाने अभिनेत्याला त्याचा फोन परत केला. हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने “अशी प्रामाणिक माणसं ह्या जगात आहेत… म्हणून माणुसकी अजूनही जिवंत आहे” असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा : लव्ह नव्हे तर अरेंज मॅरेज! ‘असं’ जमलं पूजा सावंतचं लग्न; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “त्याचं स्थळ…”
अंशुमन विचारे आणि त्याची पत्नी पल्लवी या व्हिडीओमध्ये सांगतात, “आमचे एक दादा आहेत राकेश साळवी. माझा फोन पडला होता आणि या दादांना तो फोन सापडला. त्यांनी माझ्या बायकोला फोन करून याबद्दल माहिती दिली. एवढंच नाहीतर त्यांनी तो फोन आम्हाला आणून सुद्धा दिला. आजच्या काळात एवढी मदत करणं ही खूप मोठी आहे. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून जग चालतंय. पैसेवाले देखील एवढं चांगलं वागत नाहीत त्यामुळे आपण सामन्यांकडून काय अपेक्षा करणार? पण, तुम्ही खरंच ग्रेट आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवणार आहोत. थँक्यू दादा!”
हेही वाचा : उमेश कामत : मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, वाणिज्य शाखेत पदवी ते ‘आभाळमाया’, रंगभूमीला आपलंस करणारा ‘नवा गडी’!
दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने, “खूप सुंदर कोकणातील माणसं खूप प्रामाणिक असतात” अशी कमेंट केली आहे. तर, आणखी काही युजर्सनी “मस्त दादा! अशी माणसं पाहायला मिळत नाहीत”, “अंशू बरं झालं तुम्ही हे पोस्ट केलात”, “त्यांना बक्षीस द्या” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.