Antarpaat Serial Off Air : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर १० जूनपासून गौतमी व क्षितिजच्या नात्याची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘अंतरपाट’ असं मालिकेचं नाव होतं. अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री प्रतीक्षा शिवनकर, रेशम टिपणीस, संकेत कोर्लेकर, राजन ताम्हाणे, मिलिंद पाठक, ऋषीकेश वांबूरकर हे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. १० जूनपासून सुरू झालेल्या ‘अंतरपाट’ मालिकेने अवघ्या अडीच महिन्यात प्रेक्षकांना निरोप घेतला आहे. टीआरपीअभावी वाहिनीने ‘अंतरपाट’ मालिकेचा थोडक्यातच गाशा गुंडाळला. ‘अंतरपाट’ मालिकेच्या भागांचं शतकही पूर्ण झालं नाही. ७६ भागांतच मालिका संपवली. यामुळे अनेक प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण मालिकेचा शेवट काय झाला? जाणून घ्या…
‘अंतरपाट’ मालिकेच्या सुरुवातीला जान्हवीच्या प्रेमात असलेल्या क्षितिजला गौतमीबरोबर लग्न करणं मान्य नसतं. क्षितिजचं जान्हवीवर जीवापाड प्रेम असतं. पण घरच्यांच्या आग्रहा खातर क्षितिज गौतमीबरोबर लग्न करतो. मात्र लग्न करूनही दोघांमध्ये जान्हवी नावाचा अंतरपाट असतोच. गौतमीला लग्नानंतर काही काळाने क्षितिज व जान्हवीच्या प्रेमाबद्दल कळतं. तरीही गौतमी संसार मोडण्याचा विचार करत नाही. परंतु क्षितिज गौतमीबरोबर घटस्फोट घेण्यासाठी तयार असतो. पण त्यानंतर क्षितिज व गौतमी मधलं नातं बहरू लागतं. दोघं एकमेकांच्या जवळ येतात. यामुळे मालिकेचा शेवट घटस्फोटाने न होता गौतमी व क्षितिजच्या नव्या नात्याने झालेला पाहायला मिळाला.
शेवटच्या भागामध्ये गौतमी, क्षितिज व जान्हवीच्या नात्याच्या मधे येऊन नये म्हणून घटस्फोट द्यायला तयार होते. त्यामुळे ती माहेरी निघून जाते. बॅग घेऊन आलेल्या गौतमीला पाहून माहेरच्यांना धक्काच बसतो. त्यानंतर ती सगळं काही घरच्यांना सांगते आणि मुंबईला निघून जाण्यासाठी बाहेर पडते. पण दुसऱ्याबाजूला क्षितिजला जाणीव होते की, आपण गौतमीच्या प्रेमात पडलो आहोत. तिच्यापासून दूर राहू शकत नाही. हे पाहून जान्हवी संतापते. पण असं असलं तरी जान्हवी क्षितिजला घेऊन गौतमीच्या माहेरी जाते. त्याचं वेळेस गौतमी मुंबईला जात असते. पण जान्हवी तिला अडवते. क्षितिज हा गौतमीचा असल्याचं सांगते आणि दोघांचे हातात हात देते. तेव्हा जान्हवी म्हणते की, तुमच्या संसारातला अंतरपाट आता दूर झाला आहे.
जान्हवी गेल्यानंतर पुन्हा एकदा आनंदात गौतमीचं क्षितिजच्या घरी स्वागत केलं जात. औक्षण करून माप ओलांडून गौतमी पुन्हा एकदा क्षितिजबरोबर नव्याने संसारला सुरुवात करते. यावेळी गौतमी आणि क्षितिज खूप छान उखाणा घेतात. गौतमी उखाणा घेत म्हणते, “नदीला सापडतो जसा नव्याने काठ…किनाऱ्याला येऊन भेटते जशी नवनवीन लाट…क्षितिज रावांच्या सोबतीने पुन्हा चालते ही वाट… कारण खऱ्या अर्थाने आमच्या दोघांमधला सरलाय आता अंतरपाट…” त्यानंतर क्षितिजही गौतमीसाठी खास उखाणा घेतो. म्हणतो, “वाटलं नव्हतं इतक्या सहज जुळतील रेशीमगाठी…आता पुढचा माझा प्रत्येक जन्म असेल फक्त गौतमीसाठी…” अशा प्रकारे गौतमी व क्षितिजचा पुन्हा एकदा गृहप्रवेश झाल्यानंतर नीरज एक सेल्फी काढतो आणि इथेच ‘अंतरपाट’ मालिकेचा शेवट होता.
दरम्यान, आता ‘अंतरपाट’ मालिकेच्या जागी ‘दुर्गा’ नावाची नवीन मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत अभिनेत्री रुमानी खरे आणि अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. तर अभिनेत्री शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता प्रधान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.