Celebrity MasterChef Winner : सध्या हिंदी टेलिव्हिजनवरील बहुचर्चित कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. एकूण १२ स्पर्धक ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सहभागी झाले होते. नुकतीच कबिता सिंह एलिमिनेट झाली. त्यामुळे आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सात स्पर्धक बाकी राहिले आहेत. तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, अर्चना गौतम, उषा नाडकर्णी, गौरव खन्ना, दिपिका कक्कर, मिस्टर फैजू यामधून एक जण ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विजेता होणार आहे. महाअंतिम फेरीला अजून बरेच दिवस बाकी आहेत. पण, त्याआधीच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या विजेत्याचं नाव समोर आलं आहे.

‘इंडिया फोरम’च्या माहितीनुसार, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधील टॉप-५ सदस्य निश्चित झाले आहेत. तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, निक्की तांबोळी, राजीव अदातिया आणि फैजल शेख हे टॉप-५ पर्यंत पोहोचले आहेत. अलीकडेच या टॉप-५ सदस्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तेजस्वी, गौरव, निक्की, राजीव आणि फैजल गोल्डन अप्रनमध्ये पाहायला मिळाले होते. आता या पाच स्पर्धकांमधील एकजण विजयी झाला आहे, ज्याच्या नावाचा खुलासा झाला आहे.

‘इंडिया फोरम’च्या माहितीनुसार, लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ फेम अभिनेता गौरव खन्ना ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विजेता ठरला आहे. तेजस्वी, निक्की, फैजल, राजीवला मागे टाकून गौरवने बाजी मारल्याची चर्चा सुरू आहे. पहिल्याच भागात गौरवने बेचव पदार्थ बनवला होता. त्यानंतर हळूहळू तो स्वादिष्ट पदार्थ बनवू लागला आणि अखेर त्याने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरल्याचं म्हटलं जात आहे. पण, आतापर्यंत याबाबत अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांना याची वाट पाहावी लागेल.

दरम्यान, सोशल मीडियावर गौरव खन्ना ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ जिंकल्याचं व्हायरल होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच काही जणांनी शुभेच्छा दिल्या आहे. शिवाय काही जणांच्या मते तेजस्वी प्रकाश ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ची विजेती व्हायला पाहिजे होती.

दीपिका कक्करने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम का सोडला?

दीपिका कक्करने होळी स्पेशल भागापर्यंतच चित्रीकरण केलं आहे. त्यानंतर ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये दिसणार नाही. दीपिकाला हाताचा खूप त्रास होतोय. त्यामुळे तिने काळजीखातर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की, दीपिकाच्या हाताला दुखापत झाली होती. ज्याचा त्रास बऱ्याच काळानंतर तिला पुन्हा उद्भवला आहे. डॉक्टरांनी तिला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader