‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच अन्विता फलटणकर. या मालिकेत तिने स्वीटू हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर ती मालिका विश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांशी संपर्कात असते. या मालिकेने तिला वेगळी ओळख दिली. तिचा चाहता वर्गही प्रचंड वाढला. आता एक पोस्ट शेअर करत तिने या मालिकेच्या आठवणी जागवल्या आहेत.
अन्विता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती तिच्या चाहत्यांशी तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शेअर करत असते. आज ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त अन्विताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : “मी ही अशी आहे आणि मी खूप सुंदर दिसते”, जाड असण्यावर अन्विता फलटणकर म्हणाली…
आज अन्विताने ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेदरम्यानचे बरेच फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो शेअर करताना तिने लिहिलं, “४ जानेवारी २०२१… आज हा वेडेपणा सुरू होऊन दोन वर्षे झाली. तुम्ही सर्वांनी केलेल्या भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद…” यासोबतच तिने ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ आणि फर्स्ट टेलिकास्ट हे दोन हॅशटॅगही वापरले आहेत. तिच्या या पोस्टवर तिथे चाहते कमेंट्स करत “या मालिकेला आम्ही मिस करतो,” तसंच “तुला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर बघायला आवडेल” अशा प्रतिक्रिया देत आहेत.