‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) मालिकेत सध्या अप्पी व अर्जुनच्या घरात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमोलच्या आजारपणामुळे अप्पी व अर्जुनसह त्याचे संपूर्ण कुटुंब काळजीत असल्याचे दिसत होते. अमोलच्या हट्टासाठी अप्पी व अर्जुनने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचे पाहायला मिळाले. आता अमोलही आजारातून बरा झाल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता अमोलसह गृहप्रवेश करताना अप्पीने घेतलेला उखाणा चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
गृहप्रवेश करताना अप्पीने घेतला उखाणा
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, डॉक्टर अप्पी व अर्जुनला सांगतात की अमोल बरा झाला असून त्याला घरी घेऊन जाऊ शकता. अप्पी-अर्जुनच्या घरातील सर्व जण त्यांची वाट पाहत आहेत. अप्पी-अमोल-अर्जुनचा गृहप्रवेश होताना दिसत आहे. अप्पी म्हणते की, अमोलने त्याचं वचन पूर्ण केलं आहे. आज आपलं कुटुंब आनंदी आहे असे म्हणत अप्पी उखाणा घेते. ती म्हणते, “या आगळ्या-वेगळ्या लग्नाची काय सांगू कथा, अर्जुनराव आहेतच पण आता इथून पुढे अमोलला सोबतीला घेऊन शोधेन आनंदाच्या नव्या वाटा.” अमोल बरा झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अमोलच्या साथीने अप्पी आणि अर्जुन करणारा नव्या आयुष्याची सुरुवात..!”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अप्पी-अर्जुनचा मुलगा अमोल हा सर्वांचा लाडका आहे. त्याच्या प्रेमळ स्वभावाने सर्वांना त्याने आपलेसे केले आहे. अप्पी व अर्जुनमधील दुरावा त्याच्यामुळेच कमी झाल्याचा पाहायला मिळाले. याबरोबर दोन्ही कुटुंबांना पुन्हा एकदा जोडण्याचे काम अमोलने केले. त्याच्यामुळे घरात खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याला कॅन्सरचे निदान झाले, त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून औषधोपचार चालू होते. यादरम्यान त्याच्या आई-वडिलांनी म्हणजेच अप्पी-अर्जुनने पुन्हा एकदा लग्न करावे, अशी त्याने इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या इच्छेप्रमाणे अप्पी व अर्जुनने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचे दिसले. आता अमोल बरा झाला असून ते कायम हॅपी फॅमिली म्हणून राहणार असल्याचे अर्जुनने त्याला सांगितले आहे.
आता अप्पी-अर्जुनचे कुटुंब आनंदात असल्याचे दिसत आहे. मालिकेत पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.