‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेत्री शिवानी नाईक, रोहित परशुराम, साईराज केंद्रे, संतोष पाटील, जोत्स्ना पाटील, आदित्य भोसले, प्रदीप कोथमिरे असे अनेक कलाकार मंडळी झळकलेल्या या मालिकेने तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. १५ मार्चला ही मालिका ऑफ एअर झाली. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित आहे. या मालिकेतील रुपाली म्हणजे अभिनेत्री सरिता नलावडेने मालिकेतील आतापर्यंतचा प्रवास आणि अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
अभिनेत्री सरिता नलावडेने काही फोटो शेअर करत लिहिलं, “मनापासून धन्यवाद आणि आभार…’झी मराठी’वरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या आमच्या मालिकेचा शेवटचा भाग शनिवारी, १५ मार्च रोजी प्रसारित झाला. तब्बल ८४५ भागांवर हा पूर्णविराम आला. अनेक चांगल्या रुपेरी अनुभवांचा हा प्रवास सुमारे तीन वर्ष सुरू राहिला. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे…असा हा समृद्ध करणारा अनुभव होता. या मालिकेचा एक भाग झाल्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते. नशीब एवढ्यासाठीच की चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापर्यंत अप्पीची आई आणि लूक टेस्टनंतर थेट ‘रुपाली’ हे पात्र पदरात पडणं….याला नशीब म्हणायचं नाहीतर काय.”
पुढे सरिता नलावडेने लिहिलं, “घरातली सोज्वळ सून, वहिनीपासून सुरू झालेला रुपालीचा प्रवास अनेक वळणं घेणारा होता. ४ ते ५ शेड्स या पात्राला मिळाल्या. या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम, सहानुभूती मिळाली. रुपाली निगेटिव्ह झाल्यावर लोकांनी रोषही व्यक्त केला. सोशल मीडियावर खूप शिव्या खाव्या लागल्या. बाहेर फिरताना लोकांनी तोंडावर नाराजी व्यक्त केली. खूप सल्लेही मिळत होते. परंतु ही कामाची पोचपावती होती, हे समाधान मनात कायम होते. या भूमिकेसाठी ‘झी मराठी’ने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं मानांकनही दिलं. मनोरुग्ण झालेल्या रुपालीचा भाग प्रक्षेपित झाल्यानंतर ‘झी मराठी’च्या चॅनेलच्या ईपी भाग्यश्री मॅमचा आलेला कौतुक करणारा फोन पुरस्कारापेक्षा कमी नव्हता. रुपाली ही नवी ओळख सुखावह आहे. त्यासाठी बिग थँक्यू वज्र प्रोडक्शन, श्वेता शिंदे मॅम, संजय खांबे, झी मराठी ही संधी तुमच्यामुळे मिळाली. तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या पावणेतीन वर्षांच्या प्रवासात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.”
“दिग्दर्शक आशु सर, रोहित सर तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ‘झी मराठी’वर काम करण्याचं माझं स्वप्न या मालिकेच्या माध्यमातून पूर्ण झालं. आमचे लेखक अभय जाधव, स्वप्नील कणसे यांनी अप्पी खूपच छान लिहिली. तसंच रुपाली हे पात्र खूप छान लिहिलं होतं आणि ते करताना खूप मज्जा, आनंद घेता आला. थँक्यू अभय दादा, स्वप्नील दादा. थँक्यू मकरंद सर तुम्ही माझं नाव सुचवल्यामुळे मला ऑडिशन देता आली. श्वेता मॅम, भाग्यश्री मॅम, आशु सर, खांबे सर, तुमच्यामुळे रुपाली हे पात्र माझ्या वाट्याला आले. अप्पीच्या पूर्ण टीमला धन्यवाद…आणि रसिक प्रेक्षकहो तुमचे मनापासून आभार…तुमच्यामुळे हा प्रवास खूप छान आणि स्वप्नवत झाला,” अशी सुंदर पोस्ट सरिता नलावडेने लिहिली आहे.
दरम्यान, सरिता नलावडेच्या पोस्टवर काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, मालिका खूप छान होती. सर्व कलाकारांनी खूप छान अभिनय केला. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमची खूप आठवण येणार आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मला या मालिकेची खूप आठवण येईल. कारण या मालिकेतील प्रत्येक पात्र मला खूप आवडत होतं.”