मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये टेलिव्हिजन हे माध्यम प्रेक्षकांसाठी अधिक सोईचे माध्यम असते. त्यामुळे छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा अविभाज्य भाग असतात. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करतात. केवळ मालिकाच नव्हे, तर मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतात. अशीच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector) ही मालिका.
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत सगळेच कलाकार नवोदित होते. मात्र, या मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना भावलं आणि या मालिकेनं व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. पण, तीन वर्षांनंतर नुकताच मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेनं निरोप घेताच अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रोहित परशुराम, शिवानी नाईक यांसारख्या मुख्य कलाकारांबरोबरच अल्प काळासाठी भूमिका करणाऱ्यांनीही मालिकेच्या निरोपाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे नीता टिपणीस दोंडे. त्यांनी मालिकेत अप्पीच्या आईची भूमिका साकारली होती. मालिकेच्या निरोपानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खास फोटो शेअर करीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टद्वारे त्यांनी असं म्हटलं आहे, “नुकताच ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. तसं बघायला गेलं, तर मी काही महिन्यांपूर्वीच त्यातून एक्झिट घेतली होती. पण, तरीही मी या कुटुंबाचा एक भाग होते. भलेही ते फोटोच्या रूपात का असेना. त्यामुळे शेवटचा भाग झाल्यावर सगळ्या आठवणी डोळ्यांसमोरून गेल्या. अप्पीची आई हे पात्र करताना खूप छान वाटलं. मी या टीमला काही भाग झाल्यावर जॉईन झाले होते; पण तरीही कधीच असं वाटलं नाही की, मी त्यांच्यामध्ये नंतर आले”.
यापुढे त्यांनी, “श्वेता शिंदे, खांबेसर व ‘झी मराठी’ यांनी मला संधी दिल्याबद्दल आणि मला या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारल्याबद्दल आभार” असं म्हटलं आहे. दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत शिवानी नाईक, संतोष पाटील, रोहित परशुराम, ऋषभ कोंडवार, नीलम वाडेकर, सुनील डोंगर, सुनील शेट्ये यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर, मालिकेत नंतर सामील झालेल्या चिमुकल्या अमोलचीही भूमिका प्रेक्षकांना भावली होती.