प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. आपला जीव पणाला लावून आई-वडील मुलासाठी हवं ते करत असतात. आपल्या मुलाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये, यासाठी सतत धडपड करत असतात. आई-वडिलांनी केलेल्या गोष्टींची परतफेड करता येणं हे अशक्य आहे. गेल्या महिन्यात मदर्स डे साजरा करण्यात आला. त्याप्रमाणे आज फादर्स डे साजरा केला जात आहे. प्रत्येकजण वडिलांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. यानिमित्ताने ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील सिंबाने (अमोल) आपल्या बाबांना खास सरप्राइज दिलं आहे. याचा व्हिडीओ ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ आहे. या मालिकेतील अप्पी, अर्जुन, सिंबा, दिप्या, बापू, सरकार, विनू अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री श्वेता शिंदेची निर्मिती असलेल्या या मालिकेत सिंबा म्हणजे बालकलाकर साईराज केंद्रेची एन्ट्री झाल्यापासून मालिकेला एक चांगलं वळणं आलं आहे. साईराजने साकारलेला अमोल (सिंबा) प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. प्रेक्षक त्याच्यावर खूप प्रेम करताना दिसत आहेत. आज ‘फादर्स डे’ निमित्ताने सिंबाने आपल्या बाबांना म्हणजे अर्जुनला खास सरप्राइज दिलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत, सिंबा आपल्या बाबांना शोधताना दिसत आहे. तो प्रत्येकाला बाबा कुठे आहेत? असं विचारताना पाहायला मिळत आहे. जेव्हा सिंबा आपल्या बाबांना भेटतो तेव्हा तो त्यांना डोळे बंद करायला सांगतो. त्यानंतर फुलांचा गुच्छ देऊन सिंबा अर्जुनला ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
सिंबा व अर्जुनच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया केल्या असून ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. “खूप छान”, “किती गोड आहे सिंबा”, “लव्ह यू सिंबा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd