Zee Marathi Appi Aamchi Collector Serial Off Air : ‘झी मराठी’ वाहिनीवर ऑगस्ट २०२२ मध्ये ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेद्वारे अभिनेत्री शिवानी नाईक आणि अभिनेता रोहित परशुराम यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेत शिवानी अप्पीची म्हणजेच आयपीएस अपर्णा सुरेश माने ही प्रमुख भूमिका साकारत होती. तर, रोहित या मालिकेत अर्जुनच्या भूमिकेत झळकत होता. जवळपास पावणे तीन वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवल्यावर या मालिकेने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला.
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेचे अनेकदा टाइम स्लॉट देखील बदलण्यात आले होते. मात्र, तरीही ‘अप्पी आमची कलेक्टर’चा टीआरपी बऱ्यापैकी चांगला होता. यामध्ये अप्पीच्या मुलाची म्हणजेच साईराज केंद्रेची एन्ट्री झाल्यावर या मालिकेला प्रेक्षकांची आणखी पसंती मिळाली. चिमुकला सिंबा आणि त्याची अप्पू माँ यांची केमिस्ट्री प्रत्येकाच्या मनात घर करून गेली.
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेने निरोप घेतल्यावर प्रत्येकजण भावुक झाला आहे. साईराज केंद्रेने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. साईराज सध्या लहान असल्याने त्याचं अकाऊंट त्याचे आई-बाबा हँडल करतात. त्यामुळे साईराजच्या मनातील भावना त्याच्या आई-बाबांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात, “अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. ८४५ वा भाग… तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे खूप लांबचा आणि मोठा पल्ला पार पडलाय. खूप अभिमान वाटतोय. सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय याचा आनंदही आहे आणि आज त्याच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतोय याचं दुःखही आहे… तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम असेच राहुद्या तुमचा लाडका अमोल (सिंबा)”
तर, सिंबा त्याच्या ऑनस्क्रीन आईबद्दल लिहितो, “अप्पू मां… मला माहितीये मी आज कुठेही असलो तरी तुझा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे. तू मला खूप काही शिकवलंय ते मी कधीच विसरणार नाही. Miss You खूप” यावर शिवानी नाईकने, “मिस यू बबड्या” अशी कमेंट करत साईराजला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सिंबाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सिंबा नाही दिसणार आता खूप आठवण येईल”, “खूप मोठा हो बाळा…तुला भरपूर पुढे जायचंय”, “झी मराठीचे पण आभार त्यांनी साईराजला मोठी संधी दिली”, “खूप मोठा हो तुला खूप खूप आशीर्वाद” अशा प्रतिक्रिया युजर्सनी साईराज केंद्रेच्या पोस्टवर दिल्या आहेत.