मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात रहात असतात. सोशल मीडियावर ते आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात आणि या फोटोवर चाहते मंडळीदेखील लाईक्स व कमेंट्सद्वारे त्यांना प्रतिसाद देत असतात. मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रीही सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत चर्चेत रहात असतात. अशीच एक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे (Apurva Gore). ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेतून अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने ईशा ही भूमिका साकारली होती. घरातील शेंडेफळ आणि सर्वांची लाडकी अशी ईशा प्रेक्षकांच्याही मनात घर करून राहिली. काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत रहात असतात. अशातच अपूर्वाही चर्चेत आली आहे. अपूर्वाने नुकतंच तिच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आणि या संवादादरम्यान एका चाहत्याने तिला लग्नाबद्दल विचारलं.

अपूर्वाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर प्रश्नोत्तरांचं सेशन केलं आणि या सेशनमध्ये तिला एका चाहत्याने “तू लग्न कधी करणार?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अभिनेत्रीने “चांगल्या स्थळाची वाट पाहत आहे” असं उत्तर दिलं. याशिवाय अनेकांनी तिला तिच्या अभिनय क्षेत्रातील सुरुवात, प्रवास, तिच्या सुंदर दिसण्याचं कारण, तसंच आगामी कामाबद्दलचे अनेक प्रश्नही विचारले आणि अपूर्वानेदेखील चाहत्यांच्या या प्रश्नावर मजेदार उत्तरं दिली.
अभिनय क्षेत्र सांभाळून वैयक्तिक आयुष्यात अपूर्वाने व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. अपूर्वाने ‘Raahat’ या नावाने कँडल्सचा म्हणजेच मेणबत्ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तिने बनवलेल्या कँडल्स या विशिष्ट प्रकाच्या डिझाइन्सच्या आहेत. मोतीचूर लाडू आणि फुलांचा आकाराच्या अशा आकर्षक डिझाइन्सच्या कँडल्सचा अभिनेत्री व्यवसाय करते.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर अनेक जण अपूर्वाला एका नव्या भूमिकेत पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, त्यामुळे आता अपूर्वा कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, याची तिची चाहते मंडळी आतुरतेने वाट बघत आहेत.