‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकर(Apurva Nemlekar)ला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातदेखील ती सहभागी झाली होती. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सध्या ती तिने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर?
अपूर्वा नेमळेकरने काही दिवसांपूर्वी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत स्वत:चे मानसिक आरोग्य कसे चांगले ठेवले? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अपूर्वाने म्हटले, “हे खूप अवघड आहे. बरेच लोकांना मस्करी वाटते. डिप्रेशन या संज्ञेला फार मस्करीत घेतलं जातं. काय डिप्रेशन वैगेरे नसतं, असं म्हटलं जातं. मात्र, डिप्रेशन असतं. मी बघितलं आहे. २०१७ची गोष्ट आहे. अचानक माझे बाबा गेले होते. माझ्या डोळ्यादेखत ते हार्ट अॅटॅकने गेले आणि मी काहीच करू शकले नाही. घसा कोरडा पडणं आणि काहीच न सुचणं. पूर्णपणे भावनाविरहीत होणं, अशी परिस्थिती आली होती. त्याच कालावधीत माझा घटस्फोटदेखील झाला होता. त्यामुळे जेव्हा दोन महत्वाचे पुरुष आपल्या आयुष्यातून अचानक जातात, त्यावेळी काय होतं. याचा मी अनुभव घेतला आहे.”
“एक वेळ अशी आली होती, जेव्हा मी खूप खचले होते. तेव्हा मी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली होती. मी बोलायचे, मला जे वाटतंय ते बोलायचे कारण मला रडूच यायचं नाही. मला वाटलं की मी आता याचा सामना करू शकते, त्यातदेखील ८ वर्षे गेली. या आठ वर्षातील प्रवास मला माहित आहे. कदाचित लोकांना माझ्यातील चिडकी अपूर्वा दिसते. पण त्या चिडक्या भावनेच्या मागे मी किती काय पाहिलंय, सहन केलंय.”
“मी बिग बॉसमध्ये होते, तेव्हा मी कधीच व्हिक्टीम कार्ड खेळले नाही की माझ्याबरोबर असं झालंय, माझा घटस्फोट झालाय, माझ्याबरोबर फसवणूक झाली आहे, हे सगळं न सांगता मी १०० दिवस त्या घरात प्रवास केलाय. मी गरीबच आहे आणि माझे घरचे असे आहेत, असे मी काहीही कधीच सांगितले नाही. मी जशी आहे, मी तशीच आहे. माझी काही तत्वं आहेत, त्या तत्वांवर मी खेळणार आहे. मी कधीच खऱ्या आयुष्यात आणि बिग बॉसमध्येसुद्धा कधीच व्हिक्टीम कार्ड खेळले नाही.”
दरम्यान, बिग बॉसच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अपूर्वा उपविजेता ठरली होती.