Bigg Boss Marathi 5 मधून नुकताच बाहेर पडलेला स्पर्धक अरबाज पटेल सध्या त्याच्या वक्तव्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो अनेकविध गोष्टींमुळे चर्चांचा भाग बनला आहे. आता त्याने एका मुलाखतीत त्याच्यावर कर्ज झालं होतं, असे वक्तव्य त्याने केल्यामुळे तो सध्या चर्चांचा भाग बनला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला अरबाज पटेल?

सिद्धार्थ कननच्या युट्यूबला अरबाज पटेलने नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी त्याने सांगितले की, जेव्हा त्याने इन्फ्लुएन्सर म्हणून काम सुरू केले. त्यावेळी एका मुलीने त्याची फसवणूक केली होती. याबद्दल बोलताना अरबाजने म्हटले, “मी तुमचं फॅन पेज चालवते, असं सांगून त्या मुलीनं आधी माझा विश्वास जिंकला. त्यानंतर माझ्या कुटुंबाचा, मित्रपरिवाराचादेखील तिनं विश्वास संपादन केला. माझ्या टिक टॉक अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम सुरू होता. तर तिनं मला म्हटलं की, मी टिक टॉकच्या ऑफिसमध्ये जाऊन तो प्रॉब्लेम सोडवते. काही दिवसांत माझा तो प्रॉब्लेम दूर झाला. त्यामुळे माझा तिच्यावर जास्त विश्वास बसला. त्यानंतर तिनं मला सांगितलं की, मला ट्युमर आहे आणि लास्ट स्टेजला आहे. त्यामुळे मी जास्त हळवा झालो. मी विचार केला की, ही मुलगी माझ्यासाठी एवढं करत आहे. तर मीदेखील तिच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. मी तिला बोलावले आणि माझ्या घरी ठेवले. ती मला सांगत असे की, एका गाण्यासाठी मी तुमची प्रोफाईल पुढे पाठवली होती. मॅनेजरसारखी ती काम करीत होती. त्यामुळे मला एक आशा वाटत होती. कारण- ती मला सांगत असे की, तुला बिग बॉसचा शो मिळणार आहे. एका गाण्यात तुला घेणार आहेत.”

पुढे बोलताना अरबाज पटेल म्हणतो, “एक दिवस माझ्या हातात तिचा फोन लागला आणि मला समजले की, हे सगळं खोटं आहे. तिच्या आजाराबद्दल तिनं जे काही सांगितलं तेदेखील खोटं आहे. मी माझ्या डोळ्यांनी हे सर्व बघितलं.

हेही वाचा: Video: “…ऐ बच्च्या तुझाचं मी बाहुबली”, सुबोध भावेने सूरज चव्हाणची केली हुबेहूब नक्कल, पाहा व्हिडीओ

“जेव्हा मुंबईत एकदा मी डोळ्यांनी बघितलं की, ही मुलगी मला फसवत आहे. तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. कारण- त्या काळातच माझे वडील टेरेसवरून खाली पडले होते. दीड वर्ष ते बेडवरच होते आणि घरातील मोठा मुलगा म्हणून मला घर सांभाळायचं होतं. त्या क्षणाला माझी सगळी स्वप्नं तुटल्यासारखी वाटत होती. त्यानंतरदेखील तिनं मला कामाची खोटी कागदपत्रं देऊन फसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळं संपल्यासारखं वाटत होतं. यापुढे काहीही करायचं नाही, असं वाटत होतं.”

“मला खूप राग आलेला, मी वडिलांना फोन केला आणि म्हटले की, मला या मुलीची कम्प्लेंट करायची आहे. तर त्यांनी नको म्हटलं आणि शांतपणे घरी यायला सांगितलं. पैसे संपले होते, मी माझ्या आईचं सोनं गहाण ठेवलं होते. काकांकडून कर्ज घेतलं होतं. असं करत करत २४ लाखांचं कर्ज झालं होतं. कारण- त्या दीड वर्षात मी काही कमवत नव्हतो”, अरबाज पटेलने अशी संघर्षाच्या काळातील आठवण या मुलाखतीत सांगितली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaz patel reveals that a girl cheated starting at career struggle period father accident loan nsp