Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आहे. ११ स्पर्धकांसह सुरू झालेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. मराठमोळी तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळीसह एकूण पाच जण अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या पाच जणांना गोल्डन अ‍ॅप्रन मिळालं आहे. तर अर्चना गौतम ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून एलिमिनेट झाली आहे.

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या उपांत्य फेरीतून १ एप्रिलला दोन स्पर्धक थेट अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. तेजस्वी प्रकाश व गौरव खन्ना हे दोघं पहिले अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारे दोन स्पर्धक ठरले. त्यानंतर निक्की तांबोळी, अर्चना गौतम, राजीव अडातिया, फैजल शेख यांच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आली. या चौघांमध्ये ब्लॅक अ‍ॅप्रनचा टास्क पार पडला. यावेळी विकास खन्नाची एग मॅचा चीजचेक बनवण्याचा टास्क दिला.

ब्लॅक अ‍ॅप्रनच्या टास्कमध्ये अर्चना गौतम गोंधळली. तेव्हा विकास खन्ना व रणवीर बरारने तिला सतत मोटिव्हेट करताना दिसले. पण शेवट तिचा चीजचेक थोडासा कच्चा राहिला. त्यामुळे अर्चना ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून एलिमिनेट झाली.

एलिमिनेट झाल्यानंतर विकास खन्ना, रणवीर बरार आणि फराह खानने अर्चनाचं भरभरून कौतुक केलं. तसंच ती जाता-जाता म्हणाली, “मी या कार्यक्रमात वडिलांसाठी आली होती. तुम्ही आणि या कार्यक्रमाने माझ्या वडिलांचा विचार बदलला. गेल्या २० वर्षांपासून माझे बाबा एका शब्दाला खूप सामोरे जात होते. माझे आजोबा इतके टोमणे मारायचे की, माझा जावई कूक आहे. आता मी बाबांना विचारते, काही समस्या नाही ना? तर बाबा म्हणतात, तू ये. मी तुला चिकन बनवून खायला घालेन.” त्यानंतर रणवीर बरार म्हणाला की, कूकची मुलगी असणं यापेक्षा काही सुंदर गोष्ट नाहीये. गौतमजी तुमची मुलगी हिरा आहे.

दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या अंतिम फेरीत तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, निक्की तांबोळी, राजीव अडातिया, फैजल शेख पोहोचले आहेत. आता या पाच जणांमधून कोण बाजी मारून ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम जिंकतंय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.