अप्पी व अर्जुन ही पात्रे अनेक प्रेक्षकांची लाडकी आहेत. त्यांच्यातील वेगळेपणा, एकमेकांवरचे प्रेम हे प्रेक्षकांना भुरळ घालते. ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) मालिकेतील ही पात्रे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. आता त्यांचा मुलगा अमोल याच्यामुळे ते मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
लेकासाठी अर्जुन-अप्पी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार
झी मराठी वाहिनीने ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, अर्जुन व अप्पीच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमले आहेत. अमोल त्याच्या वडिलांना म्हणजेच अर्जुनला म्हणतो, “बाबा, मला तुमचं आणि माँचं लग्न झालेलं बघायचं आहे.” अर्जुन त्याला म्हणतो, “हे नाही होणार. अजिबात नाही होणार. दुसरं अजून काय मागायचं ते माग.” हे ऐकल्यानंतर नाराज झालेला अमोल तिथून जात असतो. तितक्यात त्याला चक्कर येते आणि तो जमिनीवर पडतो. त्याला दवाखान्यात दाखल केले जाते. अप्पीचे वडील त्या दोघांना समजावून सांगताना म्हणतात, “तुम्ही लग्नाचा विचार करावा. अमोलला बरे कसे करता येईल याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे.” त्यानंतर अमोल व अप्पी दवाखान्यात जातात आणि बेशुद्ध असलेल्या अमोलला म्हणतात, “अमोल, आम्ही परत लग्न करतोय.”
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अमोलच्या इच्छेखातर अप्पी व अर्जुन पुन्हा लग्न करणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अमोलला कॅन्सरचे निदान झाले आहे. तो या आजाराशी धाडसाने लढत आहे. त्याला बरे करण्यासाठी अप्पी-अर्जुन आणि त्यांचे कुटुंब प्रयत्न करताना दिसत आहे. अमोल घरातील सर्वांत लहान असून, तो सर्वांचा लाडका आहे. त्याच्या आजारपणामुळे घरातील सर्व जण चिंतेत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच केमोथेरपीमुळे त्याचे केस गळत असल्याचा सीन दाखवण्यात आला होता. या सीनमध्ये अर्जुन व अप्पी त्याचे केस कापण्याचा निर्णय घेतात. सुरुवातीला अमोल केस कापून घ्यायला तयार होत नाही. मात्र, नंतर त्याच्यासाठी त्याचे वडील, दोन्ही आजोबा, मामा व काका असे सर्व जण केस कापण्यासाठी बसतात. त्यावेळी अमोल त्यांना तसे करू न देता, स्वत:चे केस कापून घेतो आणि या आजाराला हरवणार, असे म्हणतो. हा सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता अमोलच्या हट्टासाठी अर्जुन व अप्पी परत एकदा लग्नबंधनात अडकणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: Video: दुआ लिपा लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या गाण्यावर का थिरकली? कारण सांगत म्हणाली…
मालिकेत अमोलची भूमिका साकारणाऱ्या साईराज केंद्रेचे वेळोवेळी प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसते. तो सहजतेने अभिनय करतो. त्यामुळे तो प्रेक्षकांचाही लाडका झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता अमोल आजारातून बरा होणार का, मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.