अलीकडे तंत्रज्ञानामुळे काही गोष्टी जितक्या सहज आणि सोप्या झाल्या आहेत, तितकेच त्यातील धोकेदेखील वाढले आहेत. सोशल मीडियावरील स्कॅमबद्दलच्या अनेक बातम्या येत असतात. त्यात प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने स्कॅम करणाऱ्यांची संख्या तर आणखीनच वाढली आहे. अशातच ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेमधील आरती मोरे (Arti More) या अभिनेत्रीला सोशल मीडियावर एका व्यक्तीकडून निनावी मॅसेज आला आहे.

आरतीने स्वत: याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसंच संबंधित व्यक्तीचे अकाऊंट ब्लॉक करण्यासही सांगितलं आहे. त्याचबरोबर तिने चाहत्यांना सावध राहण्याचे आवाहनही केलं आहे. अक्षय लोखंडे नावाच्या अकाउंटवरून आरतीला एका मुलीबद्दलचा मॅसेज केला आहे आणि त्या व्यक्तीने आरतीकडे मदतही मागितली आहे. पण, संबंधित व्यक्ती आरतीच्या ओळखीची नाही, त्यामुळे तिने चाहत्यांना या संदर्भात सावध राहण्यास सांगितलं आहे.

आरतीला आलेल्या या मॅसेजमध्ये त्या व्यक्तीनं असं म्हटलं आहे की, “दीदी मला एक मदत करू शकता का? तुम्ही ऐश्वर्या चौधरीला ओळखत असाल तर तिचा नंबर मला पाठवू शकता का? तुम्ही माझ्यासाठी एक शेवटची आशा आहात; दीदी कृपया मला मदत करा ना. तुम्ही यांना ओळखत असाल तर कृपया मला मदत करा. नंबर ब्लॉक करू नका. तुम्ही माझी शेवटची आशा आहात, म्हणून मी तुम्हाला मदतीसाठी विचारत आहे.”

आरती मोरे इन्स्टाग्राम स्टोरी
आरती मोरे इन्स्टाग्राम स्टोरी

या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत आरतीने असं म्हटलं की, “तुम्हाला माझ्या नावाने असा मॅसेज येत असेल तर कृपया या व्यक्तीला ब्लॉक करा. या संदर्भात मला काहीही माहिती नाही. कृपया या व्यक्तीला ब्लॉक करा.” यापुढे तिने संबंधित व्यक्तीच्या इन्स्टाग्राम पेजचा स्क्रीनशॉट शेअर करत आणि त्या व्यक्तीचा उल्लेख करतही “या पेजला रिपोर्ट करा” असं म्हटलं आहे.

दरम्यान, आरतीने बऱ्याच मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ती ‘जय मल्हार’, ‘अस्मिता’, ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘गुलमोहर’ या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे. स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मलिकेतली तिची पिंकी ही भूमिका विशेष गाजली. शिवाय ‘दादा एक गूड न्यूज आहे’ या नाटकातली तिची भूमिकाही चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडली.