रामानंद सागर दिग्दर्शित मालिका रामायण ही अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी आपल्या या मालिकेनंतर कामाची कशी वाट बघावी लागली ते स्पष्ट केलं आहे. प्रभू राम ही भूमिका साकारल्यानंतर मला अपार प्रसिद्धी मिळाली. मात्र मला रामायणानंतर व्यावसायिक चित्रपट मिळालेच नाहीत असं म्हणत अरुण गोविल यांनी खंत व्यक्त केली आहे.
काय म्हणाले अरुण गोविल?
रामायणानंतर अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या तर काही वाईट गोष्टीही घडल्या. चांगल्या गोष्टी म्हणजे मला रामाच्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. मला या भूमिकेने हात दिला. मला प्रचंड आदर आणि सन्मान मिळू लागला. मात्र व्यावसायिक चित्रपटांपासून मी पूर्णपणे बाहेर फेकला गेलो. निर्माता आणि दिग्दर्शकांकडे मी काम मागायला गेलो की ते सांगायचे की तुम्ही रामाची भूमिकाच इतकी प्रभावीपणे केली आहे की लोक तुम्हाला इतर भूमिकांमध्ये पाहू शकत नाहीत. लोक तुमच्यात फक्त प्रभू रामालाच पाहतात, त्यांना इतर कुणीही तुमच्या चेहऱ्यात दिसत नाही. असं झाल्याने मला व्यावसायिक चित्रपट मिळणंच बंद झालं. असं अरुण गोविल यांनी ‘राजश्री अनप्लग्ड’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे
मी ग्रे शेडच्या भूमिकाही केल्या पण..
अरुण गोविल म्हणाले की माझ्या या प्रतिमेतून मुक्त होण्यासाठी मी काही ग्रे शेड असलेल्या भूमिकाही केल्या. मात्र माझ्याच ही बाब लक्षात आली की माझा नकारात्मक प्रभाव हा लोकांवर पडायला नको. मला त्यावेळी खरंच प्रश्न पडायचा की मी आता काय काम करु? मी ग्रे शेड असलेल्या भूमिकाही करुन पाहिल्या पण नंतर मलाच ही जाणीव झाली की या भूमिका करणं योग्य नाही.
अरुण गोविल हे सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ओ माय गॉड २ या सिनेमात दिसले होते. तसंच आता विनय भारद्वाज दिग्दर्शित हुकस बुकस या सिनेमातही ते दिसणार आहेत. या सिनेमात त्यांनी काश्मिरी पंडिताची भूमिका साकारली आहे. हुकस बुकस हे नाव ऐकायला कदाचित थोडं विचित्र वाटत असेल. मात्र हा काश्मिरी शब्द असून याचा अर्थ अंगाई असा आहे. ही एक धार्मिक अंगाई आहे देव आणि माणूस यांच्यातल्या नात्यावर यात भाष्य केलं गेलं आहे असं म्हणत त्यांनी या सिनेमाच्या नावाचा अर्थही सांगितला.