Ashish Patil : टीव्हीवरील प्रेक्षकांच्या भेटीला येणारे रिअॅलिटी शो हे खरंच रिअल असतात का? यावरुन कायमच चर्चा रंगताना दिसतात. अनेक कलाकार मंडळी, शोचे निर्माते किंवा दिग्दर्शक हा दावा नेहमीच फेटाळताना दिसतात. त्याशिवाय रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेकांकडूनही याबद्दल अनेकदा संमिश्र प्रतिक्रिया समोर येताना दिसतात. काही जण म्हणतात की, हो रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात, तर काही जण हे असं काही नसतं असं म्हणत सावध पवित्रा घेतात. अशातच यावर प्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शकाने त्याचं मत व्यक्त केलं आहे.
आशिषने डान्स रिअॅलिटी शोबद्दल व्यक्त केलं मत
आशिष पाटीलने डान्स रिअॅलिटी शोबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे. त्याने नुकताच सर्व काही या युट्यूब वाहिनीशी संवाद साधला आणि या संवादात त्याने रिअॅलिटी शोबद्दल त्याचं मत व्यक्त केलं. तसंच यावेळी त्याने एका हिंदी डान्स रिअॅलिटी शोचे उदाहरणही दिलं. याबद्दल आशीष असं म्हणाला की, “आजकाल आपण ऐकतो की, रिअॅलिटी शोमध्ये हे खरंच रिअल असतात का? तर मला वाटतं ‘बुगी वूगी’ हा एकमेव शो होता, जिथे डान्स सादर केला जायचा आणि त्या शोने अनेक उत्तम कलाकार घडवले आहेत. ज्यात मी किंवा धर्मेश असेल किंवा आणखी एक अलिशा म्हणून आहे.”
“आताचा कुठलाच शो ‘बुगी वूगी’ शोसारखा नाही”
यानंतर आशिषने असं म्हटलं की, “मी ठामपणे म्हणू शकतो की, आताचा कुठलाच शो ‘बुगी वूगी’सारखा शो नाही. त्या शोमध्ये पूर्णपणे तुमच्या नृत्याचं परीक्षण केलं जायचं. तेव्हा मी आम्ही चार-पाच मिनिटे डान्स करायचो. आता ते होत नाही. आता दीड ते दोन मनिटांत डान्स संपतो. तेव्हा तुम्ही उत्तम नाचलात तर उत्तम प्रतिक्रिया यायची आणि ज्या दिवशी तुम्ही नीट नाचला नाहीत, तर तेव्हा तुम्हाला तसं सांगितलं जायचं किंवा शोमधून बाहेरही पडायचे. ती एक अचूक स्पर्धा होती.”
“‘बुगी वूगी’ वेळी ठरवलं की, डान्स हे माझं करिअर होऊ शकतं”
यापुढे आशिष असं म्हणाला की, “‘बुगी वूगी’चा माझा प्रवास खूपच उत्तम होता आणि मला वाटतं आता तसा शो पुन्हा होणे नाही. कारण तिथे तुम्हाला कुठलेही कवायतीचे प्रकार करायचे नाहीत किंवा कोणतीही सामग्री वापरायची नाही. तुम्हाला फक्त तुमच्या पायांवर नृत्य सादर करायचं आहे. ‘बुगी वूगी’शो च्या वेळी मी हे ठरवलं की, डान्स हे माझं करिअर होऊ शकतं. या शोने अनेक कलाकार घडवले. ‘बुगी वूगी शो खूप प्रसिद्ध झाला. त्यानंतर मी अनेक शोमध्ये सहभाग घेतला.”
“मी सह्याद्रीवरील ‘दम दमा दम’ शोमध्येही सहभाग घेतला होता”
यापुढे आशिषने सांगितले की, “खूप पुर्वी दूरदर्शनवर ‘चित्रहार’ नावाचा कार्यक्रम यायचा, त्यात गाणी आणि नृत्य असायचं. त्यात माधुरी दीक्षित, श्रीदेवी, जुही चावला यांच्या गाण्यांचं सादरीकरण असायचं. तर मी ते खूप बघितलं आहे. त्यानंतर आईने मला एक सवय लावली होती की, गाणं पाठ कर. जेणेकरून तुला त्या गाण्याचा भाव कळेल. मी सह्याद्री वाहिनीवरील ‘दम दमा दम’ शोमध्येही सहभाग घेतला होता. पण तो तेव्हा लोकप्रिय नव्हता. त्यामुळे लोकांना त्याबद्दल माहित नाही.”