‘शार्क टँक इंडिया’चं दुसरं पर्व सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात भारत पेचा माजी सह-संस्थापक आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर शार्क म्हणून सहभागी झालेला नाही. पण, तो या शोबदद्ल वक्तव्ये करताना दिसून येतो. अश्नीरला ‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या पर्वामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता त्याने दुसऱ्या पर्वाबद्दल भाष्य केलंय.
‘द रणवीर शो पॉडकास्ट’मध्ये अश्नीरने हजेरी लावली होती. यावेळी तू शार्क टँकचं दुसरं पर्व पाहणार आहेस का, असं विचारले असता तो म्हणाला, “नाही. मला वाटतं की मी शो सोडलाय, तर मी त्यापासून पूर्णपणे वेगळं असायला हवं. दुसऱ्या पर्वात मी नाही आणि त्या पर्वातील सर्व शार्क्सना मी सोशल मीडियावर अनफॉलो केलंय. आता तो तुमचा खेळ आहे, तुम्ही खेळा. शार्क टँकच्या शूटमध्ये पडद्यामागे काय होतंय, ते मी का पाहू. तो शो आता माझ्या आयुष्याचा भाग नाही. मी त्याच आठवणींमध्ये का जगू? मी दुसऱ्या पर्वात नसेल हे ठरल्यावरच मी सर्व शार्क्सना अनफॉलो केलं होतं,” असं अश्नीर म्हणाला.
शोमध्ये काय चालले आहे, हे आपण बघत नसल्याचं अश्नीरने स्पष्ट केलं. तो म्हणाला, “जेव्हापर्यंत शोचा भाग होतो, मला खूप मजा आली. पहिल्या पर्वाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो हिट झाला. मला वाटतं, १० हजार कोटी रुपयांची शोची फ्रेंचायझी तयार करण्यात एक भाग होतो. मी ५०० कोटी रुपयांची फ्रँचायझी सोनी टीव्हीली बनवून दिली, याचा मला आनंद आहे. कारण, पहिला सीझन चालला नसता, तर दुसरा सीझन आलाच नसता, चॅनलने स्लॉटही दिला नसता. पहिला सीझन यशस्वी झाला आआत तुम्ही दरवर्षी जाहीरातीतून ५०० कोटी कमवाल. तुमचा १० हजार कोटींचा व्यवसाय झाला आहे. हा व्यवसाय मी बनवून दिला, त्यात माझं नुकसान झालं की फायदा झाला, याने मला फरक पडत नाही,” अशा शब्दांत अश्नीरने शोच्या यशाचं श्रेय घेत निर्मात्यांना टोला लगावला.