‘शार्क टँक इंडिया’चे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात पहिल्या पर्वात शार्क झळकलेला अश्नीर ग्रोव्हरने नंतरच्या दोन पर्वात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. अशातच त्याने तिसऱ्या पर्वाबद्दल एक पोस्ट केली आहे. यंदाच्या पर्वात शार्क म्हणून काही नवे चेहरेही दिसणार आहेत. आधीचे सहा आणि नवीन सहा असे एकूण १२ शार्क या पर्वात दिसतील. यावरून अश्नीरने टोला लगावला आहे.
शनिवारी शार्क टँक इंडियाच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) पेजवर शोचा प्रोमो शेअर करण्यात आला. त्यात लिहिलं होतं, “या नवीन पर्वात शार्क टँकमध्ये एकूण १२ शार्क असतील. शार्क टँक इंडियामधील नवे शार्क रितेश अग्रवाल, वरुण दुआ, दीपिंदर गोयल, अझहर इक्बाल, राधिका गुप्ता आणि रॉनी स्क्रूवाला हे असतील.”
यावर प्रतिक्रिया देताना अश्नीर ग्रोव्हरने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) प्रोमो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्याने शार्कच्या वाढलेल्या संख्येवरून खिल्ली उडवली. यंदाचं पर्व पुढच्या पर्वासाठी शार्कसाठी ऑडिशन असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं. अश्नीरने लिहिलं, “शार्क टँक ३ शार्क टँक ४ साठी शार्क्सची ऑडिशन आहे. आयुष्यातील एक धडा आहे की आधीच सोडवलेल्या समस्येत बदल करून अनावश्यक समस्या निर्माण करू नका. शार्कची वाढलेली संख्या या शोचा दर्जा सुधारेल अशी आशा आहे.”
दरम्यान, नवीन सहा शार्क पूर्वीचे शार्क’ अमन गुप्ता, अमित जैन, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनीता सिंग आणि पीयूष बन्सल यांच्याबरोबर शोमध्ये सहभागी होतील. शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या पर्वात राहुल दुआ शोचा होस्ट म्हणून दिसणार आहे. हा शो जानेवारीमध्ये सुरू होईल असं सांगितलं जातंय, पण तारखेची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.