मालिका या प्रेक्षकांच्या कायमच जिव्हाळ्याचा विषय असतात. घरबसल्या दररोज मनोरंजन म्हणून अनेक प्रेक्षक मालिकांना पसंती देतात. अशातच कलर्स मराठीवरील मालिका या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. कलर्स वरील अशोक सराफ यांची भूमिका असलेली ‘अशोक मा.मा.’ (Ashok Mama) व ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga) या मालिकांवर प्रेक्षक विशेष प्रेम करत आहेत. नुकतेच या मालिकांचे १०० भाग पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने सेटवर जंगी सेलिब्रेशनही करण्यात आले.
‘अशोक मा. मा. आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिका महासंगम
अशातच आता दोन्ही मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकांच्या या महासंगमचा प्रोमो कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे आणि या प्रोमोमधून पिंगा गर्ल्सच्या मदतीला अशोक मामा धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच महासंगमसाठी उत्सुकतादेखील व्यक्त केली आहे.
पिंगा गर्ल्सच्या मदतीला धावून येणार अशोक मा.मा.
या प्रोमोमध्ये श्वेता व वल्लरी यांचा अपघात होतो आणि या अपघातात वल्लरीला दुखापत होते. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात भरती केलं जातं. मात्र हा अपघात असल्याने डॉक्टर “पोलिस केस आहे, त्यामुळे आम्ही यांना अॅडमिट करु शकत नाही” असं म्हणतात. तसंच डॉक्टर यांच्या नातेवाईकांना बोलवा असंही सांगतात. तेव्हा वल्लरीच्या मैत्रीणी तिचा नवरा किंवा अन्य नातेवाईक इथे नसल्याचे असं सांगतात. इतक्यात अशोक मा. मा. तिथे येतात आणि डॉक्टरांना “मामा चालेल का?” असं विचारतात.
अशोक मा. मा. घेणार वल्लरीची जबाबदारी
पुढे ते डॉक्टरांना “जिथे जीवन मरणाचा प्रश्न येतो तिथे बाकीचे प्रश्न महत्त्वाचे ठरत नाहीत” असं म्हणतात. तसंच अशोक मा.मा. मी यांची जबाबदारी घेत असल्याचेही म्हणतात. त्यामुळे आता अडचणीत संपडेलेल्या पिंगा गर्ल्सच्या मदतीला अशोक मामा धावून आल्याने पिंगा गर्ल्स या संकटातून नक्कीच बाहेर पडतील. येत्या सोमवारी म्हणजेच २४ मार्च रोजी दुपारी १ आणि संध्याकाळी ७ या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहता येणार आहे.
‘अशोक मा. मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेविषयी
दरम्यान, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि विधिशा म्हसकर या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. तर ‘अशोक मा.मा.’ मालिकेत अशोक सराफ यांच्यासह नेहा शितोळे व रसिका वाखारकर प्रमुख भूमिकेत आहेत.