‘कलर्स मराठी’ वाहिनीवर लवकरच दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन मालिकांचा येत्या रविवारी, २४ मार्चला महासंगम होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा महासंगम प्रसारित होणार आहे. या दोन तासांच्या महासंगममध्ये नेमकं काय-काय घडणार आहे? जाणून घ्या…
‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतील पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात नेहमीच काहीना काही नाट्यमय घडत असतं आणि यावेळीही त्याला अपवाद नाही. श्वेता आणि वल्लरीचा अचानक खूप मोठा अपघात होणार असून वल्लरीचा जीव धोक्यात येतो. तेव्हाच अशोक मामा तिच्या मदतीला धावून येणार आहेत. ‘अशोक मा.मा.’ मालिकेत पिंगा गर्ल्स आणि मामांचा परिवार मिळून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसणार आहेत. पण, अचानक घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसतो. आता नक्की काय घडतं? मामा वल्लरीचा जीव कसा वाचवणार? हे महासंगममध्ये पाहायला मिळणार आहे.
‘अशोक मा.मा.’ मालिकेत मामांचा वाढदिवस हा त्यांच्या सगळ्या लाडक्या मुलांसाठी आनंदाचा दिवस आहे. नेहमीप्रमाणे सकाळी त्यांनी फास्टिंग शुगर चेक केली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथेच त्यांची भेट होणार आहे श्वेता आणि वल्लरीशी. पण ही भेट आनंदाची नव्हे, तर चिंतेची ठरते. वल्लरी गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ असते आणि डॉक्टर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार देतात. मात्र, मामा पुढाकार घेत डॉक्टरांना समजावताना दिसणार आहेत.
दरम्यान, मुलांना कळतं की मामांचा वाढदिवस आहे आणि त्याचवेळी पोलीस श्वेताची चौकशी सुरू करतात. मामा परिस्थिती हाताळून सांगतात की ते तिचे नातेवाईक आहेत. प्रेरणाला समजतं की वल्लरीला अपघात झाला आहे आणि सगळे अस्वस्थ होतात. मामा घरी परततात. सगळ्या घरात आनंदाचं वातावरण आहे. प्रेरणा, तेजा, मिठ्ठु, श्वेता, मनोज आणि सगळे कुटुंबीय मिळून त्यांचं ६५ दिव्यांनी औक्षण करतात. हे पाहून भैरवीचे डोळे पाणावतात. मामांच्या डोळ्यांत समाधान झळकतं. त्यांच्या आयुष्यातील हा अनोखा क्षण पाहून घरच्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसतं. या साऱ्या घटनांमुळे मामांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो. आता या सगळ्या घडामोडींमुळे मामांच्या आणि भैरवीच्या नात्यात काही नवीन वळण येणार का? पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात पुढे काय होणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.