ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची एव्हरग्रीन जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रात काम करून या दोघांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. निवेदिता व अशोक सराफ यांनी नुकतीच ‘सूर नवा ध्यास नवा’च्या रंगमंचावर हजेरी लावली होती. या दोघांमध्ये असलेल्या सुंदर नात्याची झलक यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या आगामी भागात निवेदिता व अशोक सराफ येणार आहेत. यावेळी या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका रसिका सुनीलने अशोक मामांना एक प्रश्न विचारला. यावर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून भर कार्यक्रमात एकच हशा पिकला. अशोक सराफ नेमकं काय म्हणाले पाहुयात…
हेही वाचा : “चुकीचा निर्णय…”, ‘३६ गुणी जोडी’मालिकेच्या वेळेत तिसऱ्यांदा केला बदल, नेटकरी संतप्त होत म्हणाले…
रसिका सुनील या जोडप्याला एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल अनेक प्रश्न विचारते. “निवेदिता यांचं सगळ्यात आवडतं पर्यटनस्थळ कोणतं आहे?” या प्रश्नावर अशोक मामा म्हणतात, “स्वयंपाकघर…कारण, सगळ्यात जास्त ती स्वयंपाक घरात असते. बाहेर येते..पुन्हा आत जाते, कधी कधी एकदा आत गेली की खूप वेळ बाहेर येतच नाही मग, ते पर्यटनस्थळचं झालं.”
अशोक सराफ यांचं उत्तर ऐकून रंगमंचावर उपस्थित स्पर्धक आणि प्रेक्षक सगळेच हसू लागतात. निवेदिता यांनी देखील अशोक मामांचं म्हणणं मान्य केल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोघांच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रेक्षकांना हा भाग येत्या शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.