Ashok Saraf & Nivedita Saraf : मराठी मनोरंजनविश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावर्षी या सोहळ्याचं २५ वं वर्ष होतं. यानिमित्ताने अभिनेता रितेश देशमुख व अमेय वाघ यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. मानाचा जीवनगौरव पुरस्कार हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असतं. यंदा या पुरस्कारावर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपलं नाव कोरलं. त्यांना सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

निवेदिता सराफ गेली वर्षानुवर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही त्या विविध मालिका व चित्रपटांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. घर व करिअर या दोन्ही गोष्टी उत्तमप्रकारे सांभाळून त्यांनी लाखो स्त्रियांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला. मराठी कलाविश्वातील त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी त्यांचा ‘झी मराठी जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने त्यांच्या विविध गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करून त्यांना मानवंदना दिली. यानंतर पुरस्कार स्वीकारताना निवेदिता यांनी त्यांचे पती व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मंचावर आमंत्रित केलं. पुढे, निवेदिता यांनी पती अशोक सराफ यांच्यासह त्यांचे पहिले दिग्दर्शक महेश कोठारे, सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांचे आभार मानले. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हा सन्मान मिळाला आहे असंही त्या म्हणाल्या.

अशोक सराफ निवेदिता यांच्याबद्दल काय म्हणाले?

निवेदिता सराफ पुरस्कार स्वीकारताना भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अशोक सराफ यांनी भावना व्यक्त करत पत्नीचं कौतुक केलं. अभिनेते म्हणाले, “माझं नाव अशोक सराफ मी हिचा नवरा… ( उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं ) माझ्याबरोबर तिने एवढी वर्षे संसार केला…खरंतर तिने मला कायम खूप पाठिंबा दिला. मी कामानिमित्त जास्तीत जास्त बाहेर असायचो. तेव्हा घरातल्या सगळ्या गोष्टी, सगळा कारभार तिने सांभाळला. मला काहीच माहिती नाहीये. माझ्या आयुष्यात जे काही स्थैर्य आलं ते फक्त हिच्यामुळे आलं…याचं श्रेय तिचं आहे, हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा माझं जे काही होतं की लग्न करायचं नाहीये. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की, हिच्याबरोबर लग्न करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता.”

Ashok Saraf
Ashok Saraf

दरम्यान, यंदा निवेदिता सराफ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार तर, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा मानाचा पुरस्कार दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना प्रदान करण्यात आला.

Story img Loader