मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडपे म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) व अभिनेत्री निवेदिता सराफ. (Nivedita Saraf) अशोक व निवेदिता सराफ यांनी आजवर नाटक, मालिका व चित्रपटांमधून अभिनय करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेही त्यांनी भरभरून मनोरंजन केलं आहे. गेली दोन दशके अशोक सराफ ((Ashok Saraf) यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना गेल्यावर्षी ‘महाराष्ट्र भूषण’ व यावर्षी ‘पद्मश्री’ हे दोन प्रतिष्ठित व मानाचे समजले जाणारे पुरस्कार मिळाले. अशातच अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनाही यंदाच्या ‘जीवनगौरव’ (Jeevan Gauarv) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कलाविश्वातील योगदानाबद्दल त्यांचा ‘जीवनगौरव’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
निवेदिता सराफ यांनी (Nivedita Saraf) आजवर अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ घातली आहे. कलाविश्वातील हेच योगदान लक्षात घेऊन यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ (Zee Chitra Gauarv 2025) पुरस्कार सोहळ्यात त्यांचा ‘जीवनगौरव’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांच्यावर चाहत्यांसह कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. या पुरस्कार सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच झी मराठीने नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात निवेदिता त्यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी अशोक सराफांना मंचावर आमंत्रित करतात आणि अशोक सराफ (Ashok Saraf) त्यांना वाकून नमस्कार करतात.
या व्हिडीओमध्ये निवेदिता सराफ ट्रॉफी हातात घेत असं म्हणतात की, “अशोक… तू इथे आल्याशिवाय मी हा पुरस्कार स्वीकारूच शकत नाही”. त्यानंतर अशोक सराफ स्मितहास्य करत मंचावर जातात आणि मंचावर जाताच ते निवेदिता यांना वाकून नमस्कार करतात. त्यांच्या या कृतीचे सोहळ्यातील सगळेच जण टाळ्या वाजवत कौतुक करतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्या खास नात्याचंही अनेकांनी कौतुक केलं आहे.
निवेदिता यांच्या जीवन गौरव पुरस्कारानिमित्त सोनाली कुलकर्णीने खास परफॉर्मन्स सादर करत अभिनेत्रीला मानवंदना दिली. निवेदिता यांच्या चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यावर सोनालीने नृत्याविष्कार सादर केला. तसंच हा पुरस्कार स्वीकारताना निवेदिता यांनी “काय बोलू, मी खूप भावनिक झालीये. हा पुरस्कार खरंतर माझ्या माहेरचा पुरस्कार आहे” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. दरम्यान, येत्या ८ मार्च रोजी झी मराठी वाहिनीवर ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.