Ashvini Mahangade : ‘आई कुठे काय करते’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरांत लोकप्रिय झाली. अनेकदा राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर अश्विनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं स्पष्ट मत मांडत असल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री राजकारणाकडे वळणार याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर अश्विनी महांगडेने राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

अश्विनीला ( Ashvini Mahangade ) शरद पवार गटात महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीचं उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे. साताऱ्यातील वाई इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. याच मेळाव्यात अश्विनीने पक्षप्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते.

अश्विनी महांगडेची पोस्ट

अश्विनी महांगडे ( Ashvini Mahangade ) पोस्ट शेअर करत लिहिते, “माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. अगदी गावातल्या निवडणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देऊन ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याचं व्हायच्या. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणं हे त्यांच्या रक्तातच होतं. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचं. पण, साधारण ४ वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की, ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली, तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचं स्वप्न आज ४ वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पूर्ण झालं आहे. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी आधी दिलेला नकार, मग घडलं असं काही…; प्राजक्ता माळीने स्वत: केला खुलासा, कसा बदलला निर्णय?

“मी स्वीकारलेलं हे काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झालं. त्या सगळ्यांचे आभार… राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट महिला काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्याबद्दल मी मन:पूर्वक आभारी आहे. शरद पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील, अमोल कोल्हे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे प्रसाद काका सुर्वे, डॉ. नितीन सावंत, राजकुमार पाटील, बाबर, संतोष पवार यांची मी ऋणी आहे #राजकारणातून घडेल समाजकार्य” अशी पोस्ट शेअर करत अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अश्विनीच्या ( Ashvini Mahangade ) पोस्टवर नेटकऱ्यांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मनोरंजन विश्वात अभिनेत्री सक्रिय असूनही गेल्या अनेक वर्षांपासून ‘रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेअंतर्गतही ती सामाजिक कार्ये करत आहे.