‘आई कुठे काय करते’फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. त्याबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ती विविध व्हिडीओ शेअर करीत प्रेक्षकांच्या संपर्कात असते.

अश्विनी महांगडे काय म्हणाली?

आता अश्विनी महांगडेने एका मुलाखतीत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. ती दीक्षाभूमीला जाऊन आल्यानंतर तिचा काय अनुभव होता, यावर तिने वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी ‘मराठी मनोरंजन विश्व’ या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अश्विनी महागंडे म्हणाली, “नाही म्हटलं तरी आपण विविध रंगांमध्ये विभागले गेलो आहोत. माझ्यासाठी असं नाहीये, ही जात वेगळी, ती जात वेगळी, असं काही नाही. मी सगळ्यांकडे माणूस म्हणूनच बघते. पण, हे तितकंसं लोकांपर्यंत पोहोचत नाही. कारण- जेव्हा अश्विनी महांगडेचं म्हणजे लोक प्रोफाईल बघतात तेव्हा त्यांना मी जय शिवराय करताना दिसते. शिवाजी महाराजांचे विचार मांडते. तर ती मी तशी नाहीये, हे मला माहीत आहे.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “मी नागपूरला गेले होते. दीक्षाभूमीला मी भेट दिली. मला तिथे जायचं होतं. अखेरीस मी तिथं गेले. मी त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. तिथे गेल्यानंतर तिथे जी माहिती लिहिली आहे, ती मी वाचली. तो वेळ मी तिथे घालवला. मी तिकडे जाऊन आले. मी त्यासंबंधीची पोस्ट शेअर केली. मला बऱ्याच जणांचे इन्स्टाग्रामला मेसेज आले. जय भीम, असे ते मेसेज होते. मी त्यांना रिप्लाय करताना ‘जय भीम’ असा रिप्लाय दिला. तर माझं असं होतं की, आपण दोन माणसं भेटल्यानंतर आपण एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करतो, जय शिवराय, जय भीम म्हणतो.”

“आपण एकमेकांना चांगल्या पद्धतीनं वागवणं, हे गरजेचं आहे. तुमची ती भाषा आहे, तर माझीही तीच असू शकते. जी आपल्याला एकमेकांना समजेल. तर एका ताईंना मी त्यांच्या जय भीम या मेसेजवर पुन्हा जय भीम, असा रिप्लाय दिल्यानंतर त्यांनी मला मेसेज केला. त्यांनी असं लिहिलं होतं की, मी आयुष्यात असा कधीही विचार केला नव्हता. मला असं वाटलेलं की, तुम्ही मला उत्तरच देणार नाही किंवा तुम्ही जय शिवराय असे लिहाल. तुमता जय भीम, असा मेसेज वाचल्यानंतर मला इतका आनंद होतोय की, मी तो शब्दांत मांडू शकत नाही. तर ही खूप सोपी गोष्ट आहे. त्या ताईंनी मला जाणीव करून दिली की, आपण असं सोपं जगू शकतो.”

दरम्यान, अभिनेत्रीने असेही सांगितले की तिने दोन वेळा वेगवेगळ्या भाषांत संविधान वाचण्याचा प्रयत्न केला आहे. आता अभिनेत्री आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.