पडद्यावर दिसणाऱ्या पात्रांमध्ये विविध नाती पाहायला मिळतात. कधी ही नाती पाठिंबा देणारी असतात; तर कधी ती मैत्रीपूर्ण किंवा शत्रुत्वाची असतात. मात्र, खऱ्या आयुष्यात हे कलाकार चांगले मित्र असल्याचे पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अनेक कलाकार व त्यांच्या मैत्रीबद्दलची माहिती मिळत असते. आता अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade)ने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री अश्विनी महांगडेने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अश्विनीने अभिनेत्री कौमुदी वलोकर व तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने या फोटोंना लक्षवेधक कॅप्शन दिली आहे. तिने पुढे, “कौमुदी आणि दाजीसाहेब. कायम हसत राहा. प्रेम करत राहा. लवकरच जूते लो पैसे दो”, असेही मिश्कीलपणे म्हटले आहे.
अश्विनीने शेअर केलेल्या फोटोंवर कौमुदीने कमेंट करीत लिहिले, “सर्वांत लाडकी जागा आणि माणसंसुद्धा- अश्विनी व आकाश.” त्याबरोबरच तिने लिहिले, “फोटो जुना आहे. आम्हाला भेटत नाही, असे म्हणू नये.” अभिनेत्रीने शेअर केलेले हे फोटो पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील असल्याचे तिने दिलेल्या हॅशटॅगमधून समजत आहे. चाहत्यांनीदेखील या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, “आमचं फर्ग्युसन महाविद्यालय आणि त्यात ताई.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “खूप छान जोडी आहे आरोही.” आणखी एका चाहत्याने म्हटले, “अभिनंदन!” तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करीत त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे.
अभिनेत्री कौमुदी वलोकरने आकाश चौकसेबरोबर ३१ डिसेंबर २०२३ ला साखरपुडा झाल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बॅचरल पार्टीचे फोटो पाहायला मिळाले.
अश्विनी महांगडे व कौमुदी वलोकर यांच्याबद्दल बोलायचे, तर आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. त्या मालिकेत अश्विनीने अनघा ही भूमिका; तर कौमुदीने आरोही ही भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले होते. दोघींच्याही भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसले. आता या दोन अभिनेत्रींची मैत्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच अश्विनीने कौमुदी व तिच्या आई-वडिलांसह काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आणि त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.