‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशनसिंग सोढी ही भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार २६ एप्रिलला दिली होती. तेव्हापासून त्याचा शोध सुरू आहे. घरातून दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी निघालेला गुरुचरण सिंग विमानतळावरही पोहोचला नाही व घरीही परतला नाही. ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गुरुचरणबद्दल मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुरुचरण सिंगवर वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी होती, असं असित मोदींनी म्हटलंय. “ही खूप वेदनादायक आणि धक्कादायक बातमी आहे. त्याचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होतं. त्याने आपल्या आई-वडिलांची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली होती. वैयक्तिक आयुष्याबद्दल एकमेकांना काही सांगावं इतकी आमच्यात जवळीक नव्हती, पण मला जितकं त्याच्याबद्दल माहित आहे, त्यावरून तो खूप धार्मिक होता, असं असित मोदी टाइम्स नाऊशी बोलताना म्हणाले.
गुरुचरण सिंगशी खूपदा भेट व्हायची, असं असित यांनी सांगितलं. “तो बेपत्ता झालाय हे ऐकून मला धक्का बसला. हे का घडलंय, ते मला माहित नाही. सध्या तरीही तपास सुरू आहे, त्यामुळे तपासातच याबाबत काहीतरी कळू शकेल. मी देवाला प्रार्थना करतो की तो सुरक्षित असेल आणि त्याने फोन उचलावे,” असं असित म्हणाले.
गुरुचरणला त्याच्या मानधनाची थकबाकी वेळेवर दिली होती का? असा प्रश्न विचारल्यावर असित म्हणाले, “असं काही नव्हतं. करोनामुळे थकबाकी झाली होती. तो काळ आम्हा सर्वांसाठी तणावाचा होता. शूटिंग थांबलेलं होतं. शो सुरू होईल की नाही हेही आम्हाला माहित नव्हतं.”
ल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुचरण सिंग दिल्लीतील अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी गुरुचरणच्या मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता, यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. २४ तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता, तिथेच जवळच्या एटीएममधून त्याने पैसेही काढले होते. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला व अजून त्याच्याबद्दल कोणतीची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.