स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Ata Hou De Dhingana 3) हा कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) आपल्या अनोख्या सूत्रसंचलनामुळे या कार्यक्रमाला विशेष पसंती मिळताना दिसते. शिवाय या कार्यक्रमात होणारे अतरंगी टास्क आणि गेम्सही या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. दर आठवड्यात या कार्यक्रमात स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांमधील कलाकार हजेरी लावतात आणि दोन गटांत होणारी मजा मस्ती या कार्यक्रमात पाहायला मिळते.
या कार्यक्रमात दर आठवड्याला नवनवीन टास्क आणि गेम्स खेळले जातात. अशातच आता येत्या आठवड्यात ‘होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर गवळण हा पारंपरीक लोककला प्रकार सादर होणार आहे. नुकताच या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे आणि या प्रोमोमध्ये सिद्धार्थ जाधव कार्यक्रमात आलेल्या कलाकारांसह गवळण हा कलाप्रकार सादर करताना दिसत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘होऊ दे धिंगाणा३’मधील गवळण विशेष प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सिद्धार्थने गवळणमधील पेंद्या ही भूमिका साकारलेली दिसत आहे. तर त्याला अभिनेता अभिजीत खांडकेकर व पंढरीनाथ कांबळे यांनीही साथ दिली आहे. अभिजीत हा कृष्ण बनला आहे तर पंढरीनाथ यांनी मावशीची भूमिका केल्याचे पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थ, अभिजीत व पंढरीनाथ यांच्यातील ही खास जुगलबंदी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सिद्धार्थ, अभिजीत व पंढरीनाथ यांच्या गवळण सादरीकरणानंतर मयूरी कापडणे आणि क्षमा देशपांडे या नायिका गवळण नृत्यही सादर करतात. त्यामुळे एकूणच ‘होऊ दे धिंगाणा ३’चा आगामी भाग मनोरंजक असणार आहे.

येत्या शनिवारी व रविवारी रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा गवळण विशेष भाग पाहता येणार आहे. या भागात स्टार प्रवाहच्या काही जुन्या मालिकांमधील कलाकारही सहभागी होणार असल्याचे या प्रोमोमधून दिसत आहे.
दरम्यान, नुकताच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५’ जल्लोषात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे पाचवं वर्ष होतं. या सोहळ्यात ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमाने सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा पुरस्कार पटकावला.