Ata Houde Dhingana 3 : ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमाची स्टार प्रवाहवर दमदार एन्ट्री झाली आहे. १६ नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम सुरू झाला असून याचे दोन भाग आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर मालिकांमधील कलाकार नेहमीच कल्ला आणि धिंगाणा करताना दिसतात. अशात आता या मंचावर पहिल्यांदाच आई आणि मुलीच्या नृत्याची जुगलबंदी पहायला मिळणार आहे.
‘आता होऊ दे धिंगाणा ३’ मध्ये या आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या दोन मालिकांमधील कलाकार येणार आहेत. त्यांचे काही प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील आई आणि लेकीने जबरदस्त नृत्य सादर केलं आहे.
हेही वाचा : “जसं दिसतं तसं नसतं”, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ‘त्या’ सीनचे असे होते शूटिंग; पाहा व्हिडीओ
स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ चा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मृण्मयी गोंधळेकर यांच्या डान्सची दमदार जुगलबंदी दिसत आहे. दोघीही एकापेक्षाएक अशा सुंदर डान्स स्टेप्स करत आहेत. शोमध्ये आलेले अन्य कलाकारदेखील या दोघींचा डान्स मस्त एन्जॉय करत आहेत.
‘आता होऊ दे धिंगाणा ३’ च्या आगामी भागाचा आणखी एक प्रोमो व्हि़डीओ समोर आला आहे. यामध्ये सर्व कलाकारांना एक भन्नाट खेळ देण्यात आला आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, सिद्धार्थ जाधव सर्व कलाकारांना खेळाची माहिती देत आहे. जमिनीवर एक ते दहापर्यंत अंक लिहिलेली एक मॅट ठेवण्यात आली आहे. तसेच शेजारी सापशीडीमधील अंकांचा ठोकळा आहे. या ठोकळ्यावर जितके नंबर येतील, त्याप्रमाणे मॅटवरील अंकात उडी मारायची आहे.
विशेष म्हणजे ज्या मॅटवर उड्या मारत हा खेळ खेळायचा आहे, त्यावर सर्वत्र साबणाचे पाणी टाकण्यात आले आहे. तसेच हातामध्ये पाण्याने भरलेला एक टप घेऊन यावर उड्या मारायच्या आहेत, त्यामुळे उडी मारताना पाणी खाली सांडते आणि स्पर्धक पाय घसरून पडतात, अशी धमाल मजामस्ती या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : ‘या’ मराठी चित्रपटासाठी तीन दिग्गज गायकांनी पहिल्यांदाच एकत्र केलं पार्श्वगायन; सिनेमा पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ने १० नोव्हेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर या कार्यक्रमाच्या जागी ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ हा कार्यक्रम सुरू झाला. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ १६ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता पाहता येणार आहे.