अभिनेत्री अतिशा नाईक((Atisha Naik) यांनी ‘दिल्या घरी सुखी राहा’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा अनेक मालिकांत काम केलं आहे. ‘वेक अप सिड’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘ताजा खबर’ या चित्रपट व वेब सीरिजमध्ये अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या आहेत.

सध्या अभिनेत्री ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ज्येष्ठ कलाकारांना शूटिंगदरम्यान सवलती दिल्या पाहिजेत का? यावर वक्तव्य केले आहे.

अतिशा नाईक काय म्हणाल्या?

अतिशा नाईक यांनी नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, शूटिंगदरम्यान ज्येष्ठ कलाकारांना काही सवलती मिळायला हव्यात का? त्यावर अतिशा नाईक म्हणाल्या, “सवलत द्यायची म्हटली की, बाकीच्या लोकांच्या ते डोळ्यांत येतं. आम्हाला का मिळत नाही, असं बाकीच्या कलाकारांना वाटतं. त्यामध्ये लिंग भेदभाव नसतो. कामानं आणि वयानं तुम्ही ज्येष्ठ असलात तरी प्रॉडक्शन असं सांगत की, जर तुम्हाला अमुक तास उदाहरणार्थ ८-१० तास काम करायचं असेल, तर तुमचे पैसे कमी करणार. तुम्हाला १२-१५ तासाचे पैसे द्यायचे? असं प्रॉडक्शनचं म्हणणं असतं.

पुढे अभिनेत्री म्हणाल्या, “मी माझ्या बाबतीत आलेला अनुभव सांगते. क्लोजच्या वेळेला तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तुम्ही आराम करा. दोन सीनच्या मध्ये तुम्हाला गॅप मिळते ना, तेव्हा तुम्ही पॉवर नॅप घ्या, हे सांगितलं जातं. मुंबईत ट्रॅफिकमुळे ५-१० मिनिटांत उशीर होतोय, हे गृहीत धरलं जातं. मी मेकअप करूनच सेटवर जाते. जेव्हा मला उशीर झालेला असतो, तेव्हा मी माझी मी तयार होते. मी कोणावर अवलंबून राहत नाही. माझं चोख पाठांतर असतं. बोलावल्या क्षणी मी सेटवर जाते. मी एका टेकमध्ये सीन शूट करते. मी कुठेही उगाचच वेळ काढत नाही.”

शारीरिक क्षमतेमुळे…

पुढे अतिशा नाईक म्हणाल्या, “त्यामुळे जर ज्येष्ठ कलाकार जर सांगत असेल की, शारीरिक क्षमतेमुळे माझं कमी होतंय, तर या सगळ्या गोष्टी का ग्राह्य धरल्या जात नाहीत. तर या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीची ज्येष्ठता आणि प्रामाणिकपणा, तसेच इतक्या वर्षांचा अनुभव उपयोगी पडतोय, हे प्रॉडक्शनकडून लक्षात घेतलं जात नाही. ते म्हणतात की, मी तुम्हाला पैसे देतो ना, मग मुळातच पैसे कमी घ्या. कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं आहे की, १० तास काम करायचं आहे, तर ठरवताना तुम्हाला ते पैसे कमीच देणार. पैशाचा हिशोब ते मांडणारच.”

“फार फार तर एवढं करतील की, तुमचा सीन लवकर शूट करून संपवतील आणि तुम्हाला घरी लवकर सोडतील. हेसुद्धा तुमचं प्रॉडक्शन आणि दिग्दर्शकांची टीम यावर अवलंबून आहे. ते तुम्ही सीनियर असल्याला किती मान देतात, जाणून घेतात. यावर ते ठरतं. माझं म्हणणं असं आहे की, जर गरज नसेल तर ज्येष्ठ कलाकारांनी ही सुविधा मागू नये. मी मागत नाही. पण, आयुष्याच्या एका टप्प्यावर किंवा आजारपणामुळे किंवा घरातील काही टाळता न येणाऱ्या गोष्टींमुळे जर तुम्हाला काही गोष्टी करणं भाग असेल, तर तुम्ही बोलून त्यातून मार्ग काढा. प्रसंगी दोन पैसे कमी करावे लागत असतील तर आणि तुमची सोय होत असेल तर करा.”

“आता उदाहरणार्थ मध्यंतरी माझ्या श्वानाची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी माझ्या प्रॉडक्शन हाऊसने गोष्टी अॅडजस्ट केल्या. मी जवळपास आठवडाभर सुट्टी घेतली होती. बोलून होण्यासारख्या गोष्टी होत असतील, तर सीनियरने या गोष्टी जरूर बोलाव्यात. दोन पैसे कमी घेण्याची ताकद ठेवा. कारण- तुम्ही इतकी वर्ष काम करून थोडंफार जमवलेलं असतं.”