काही माणसं त्यांच्या साधेपणाने आणि अलौकिक कर्तुत्वाने अवघ्या जगावर आपलं गारुड करतात. अशा काही व्यक्तिमत्त्वांमध्ये येणारे काही व्यक्तीमत्त्व म्हणजे दिवंगत रतन टाटा आणि बाबा आमटे. तसंच प्रकाश आमटे. या माणसांनी त्यांच्या कर्तुत्वानं अवघ्या भारतीयांच्या मनात स्वत: अढळ स्थान निर्माण केलं आहे. बाबा आमटे किंवा रतन टाटा यांच्याबद्दलच्या प्रेमामुळे त्यांनी आपल्यातून कधीच निघून जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. तसंच काहीसं वाटलं आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अतिशा नाईक (Atisha Naik) यांना. त्यामुळे देवाने त्यांना अमरत्व द्यायला हवं असं भावुक विधानही त्यांनी केलं आहे.
अतिशा नाईक यांना नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आदर्शांविषयी विचारण्यात आलं. तेव्हा अतिशा यांनी दिवंगत बाबा आमटे आणि सर रतन टाटा यांची नावे घेत देवाने त्यांना अमरत्व द्यायला पाहिजे होतं असं म्हटलं आहे. अतिशा यांनी नुकतीच आरपारला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “रतन टाटा माझे आदर्श आहेत. मला सर रतन टाटा खूप आवडतात. माझं असं म्हणणं होतं की, परमेश्वराने कोणाला तरी अमरत्व द्यावं. हे खरे लोक आहेत आणि जे तुमच्या अमरत्वाने बदलणार नाहीत. त्यात माझ्यासाठी सर रतन टाटा पहिलं, कदाचित शेवटचं नाव आहे.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “तो माणूस इतका मोठा आणि महत्त्वाचा आहे की, ते जी पायवाट चालले असतील त्या पायवाटेच्या धुळीचा कण जरी मला मिळाला तरी माझ्या आयुष्यातील खूप गोष्टी या सुकर होतील. त्यामुळे रतन टाटा मला खूप आडवतात. शिवाय बाबा आमटेही आवडतात किंवा प्रकाश आमटे हेदेखील. ज्यांनी त्यांच्या कामात स्वत:ला अगदी झोकून दिलं आहे.”
यापुढे अतिशा यांनी रतन टाटा, बाबा आमटे आणि प्रकाश आमटे याबद्दलबद्दल असं म्हटलं की, “त्यांच्यातला खरेपणा दिसतो. त्यांचं काम दिसतं. कोणी म्हणणार आहे का प्रकाश आमटे अवॉर्ड घ्यायला सिल्कच्या झब्ब्यात का आले नाहीत. त्यांना ते शक्य आहे. अनेक लोक त्यांना मोठमोठ्या गाड्या पुरवतील. पण जो माणूस इतके वर्ष साधेपणातच जगला त्याला नंतर हे सगळं खूप खोटं आणि क्षुल्लक वाटायला लागतं.”
दरम्यान, अतिशा नाईक आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ‘घाडगे अँड सून’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आभाळमाया’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.