छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शो प्रेक्षक अगदी मन लावून बघतात. असाच गेले काही दिवस खूप चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे ‘मास्टरशेफ इंडिया.’ या कार्यक्रमाची ६ पर्व खूप गाजली. त्यानंतर आता या कार्यक्रमाचं ७वं पर्व सुरू आहे. परंतु या कार्यक्रमावर आता प्रेक्षक नाराज झाले आहेत. सोशल मीडियावरून या कार्यक्रमावर टीका केली जात आहे.
‘मास्टरशेफ’ हा कार्यक्रम जगभरात लोकप्रिय आहे. विविध देशांमध्ये या कार्यक्रमाचे अनेक सीझन्स झाले आहेत. सर्वत्र मिळणारी लोकप्रियता पाहून काही वर्षांपूर्वी ‘मास्टरशेफ इंडिया’ हा कार्यक्रम सुरू झाला. यात देशभरातून स्पर्धक सहभागी होऊन त्यांची पाककृती दाखवून देतात. या दरम्यान त्यांना विविध टास्क्सना देखील सामोरं जावं लागतं. आतापर्यंत या कार्यक्रमाला आपल्या देशातून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. टेलिव्हिजनवरील टॉप रिअॅलिटी शोच्या यादीमध्ये या कार्यक्रमाचे नाव आहे. परंतु गेले काही दिवस या कार्यक्रमाच्या परीक्षकांनी भेदभाव केल्याचं नेटकरी म्हणू लागले आहेत.
आणखी वाचा : शिव ठाकरे खरोखर ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार? खुलासा करत म्हणाला, “अजूनपर्यंत मी…”
कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांना मांसाहारी पदार्थ बनवायचा होता. परंतु या टास्क दरम्यान या कार्यक्रमातील स्पर्धक अरुणा हिला सवलत देण्यात आली. तिला मांसाहारी पदार्थाच्या बदल्यात वेगळा पर्याय उपलब्ध करून दिला. मासे वापरण्याच्या ऐवजी तिला पनीर वापरण्याची मुभा दिली गेली. इतर स्पर्धकांना मात्र मासे वापरूनच पदार्थ बनवण्यास सांगितला.
आता परीक्षकांच्या या कृतीवर प्रेक्षक टीका करू लागले आहेत. त्यांनी अरुणाला दिलेली ही सवलत योग्य नाही असं अनेकांनी म्हटलं. तर परीक्षकांनी स्पर्धकांमध्ये भेदभाव केल्याचं नेटकरी म्हणून लागले आहेत. “मास्टर शेफच्या आधीच्या पर्वामध्ये असा भेदभाव कधीही झाला नाही. अरूणा मांसाहारी नाहीत, केवळ म्हणून त्यांना सवलत दिली जात आहे. त्या नॉन व्हेज पदार्थ बनवू शकत नसतील तर त्यांनी शो सोडायला हवा,” असं एका नेटकऱ्याने लिहिलं. तर दुसरा नेटकरी मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे उदाहरण देत म्हणाला, “या शोमध्ये एका भारतीयाला शाकाहारी असूनही बीफ बनवावं लागलं होतं आणि त्याने ते बनवलं सुद्धा. एका शेफला सगळं काही यायला हवं.”