मराठी कलाविश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. या कार्यक्रमात यंदा दिग्गज मंडळी सहभागी झाली होती. या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण १६ मार्चला सायंकाळी ‘झी मराठी’ वाहिनीवर करण्यात येणार आहे. यामध्ये एकीकडे प्रेक्षकांना बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान व शिल्पा शेट्टी या दोघींचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळेल. तर, दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवधूत गुप्तेंना दिलखुलासपणे दिलेल्या उत्तरांचा आनंद घेता येईल.
‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला यावर्षी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांची गायक-दिग्दर्शक अवधूत गुप्तेंनी खास मुलाखत घेतली. कार्यक्रमात विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना अजित पवारांनी अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे उत्तरं दिली. या कार्यक्रमात त्यांनी काही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला. रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांना दोन खास प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांची उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “तुम्ही माझ्या सामानाची…”, नामांकित विमान कंपनीवर सिद्धार्थ जाधवचा संताप, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
अवधूत गुप्तेंनी “थंड बर्फ कोणाला द्याल? कोणी डोक्यावर बर्फ ठेऊन स्वत:चं डोकं शांत ठेवावं असं तुम्हाला वाटतं?” असा प्रश्न अजित पवारांना विचारला. यावर त्यांनी “हा बर्फ पार्थ पवारांना पाठवा” असं उत्तर दिलं. याशिवाय हातात रिमोट दाखवत अवधूत गुप्तेंनी पुढे विचारलं, “रिमोट कंट्रोल खरोखर कोण वापरतंय? आणि कोणाच्या हातात जायला हवा?” या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “तो माझ्याच हातात राहूदे!”
हेही वाचा : Video : “राजा फोटो माझा काढ…”, मराठी गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, दिलखेचक अदांनी चाहते घायाळ
उपमुख्यमंत्र्यांची उत्तर ऐकून पुरस्कार सोहळ्यात एकच हशा पिकला असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या मुलाखतीदरम्यान भविष्यात बायोपिक काढल्यास माझी भूमिका निलेश साबळेने करावी असं देखील अजित पवारांनी सांगितलं. दरम्यान, ‘झी चित्र गौरव २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण ‘झी मराठी’ वाहिनीवर शनिवार १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर करण्यात येणार आहे.