छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. परंतु या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त राजकारण्यांनाच बोलवलं जातं असं म्हणत काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली. परंतु आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तर आगामी भागामध्ये राजकारणी अभिजीत बिचुकले पाहुणे म्हणून उपस्थिती लावताना दिसणार आहेत. परंतु त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं प्रेक्षकांना चांगलंच खटकलं आहे.
या कार्यक्रमाच्या पुढील भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये पुढील भागात अभिजीत बिचुकले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट झालं. या प्रोमोमध्ये ते त्यांच्या हटके शैलीत अवधूत गुप्तेशी संवाद साधताना दिसत आहेत. परंतु या प्रोमोला प्रेक्षकांची नापसंती मिळताना दिसत आहे.
या प्रोमोवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अर्रर…किती वाईट दिवस आले आहेत गुप्तेवर.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कार्यक्रमाचा दर्जा घालवू नका.” तिसऱ्याने लिहिलं, “डोक्यावर पडले आहेत का झी वाले!?” तर आणखी एक कमेंट करत म्हणाला, “गुप्ते तुम्ही शो सोडून द्या…” त्यामुळे आता चॅनलला आणि अवधूत गुप्तेला नेटकरी ट्रोल करू लागले आहेत.