अभिनेते अविनाश नारकर यांचं सध्या ‘पुरुष’ नावाचं नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मराठी नाट्यसृष्टीतील गाजलेलं ‘पुरुष’ नाटक पुन्हा रंगभूमीवर पाहायला मिळत आहे. या नाटकात अविनाश नारकर यांच्यासह स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे, ऋषिकेश रत्नपारखी, संतोष पैठणे आणि शरद पोंक्षे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पुरुष’ या नाटकाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी अविनाश नारकरांनी ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अविनाश नारकर यांनी सतत रील व्हिडीओ करण्यामागचा हेतू सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचे रील व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. यामधील दोघांची एनर्जी तरुणाईला लाजवेल अशी असते. पण, अनेकदा दोघांना खूप ट्रोल केलं जातं. तरी या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून अविनाश आणि ऐश्वर्या रील व्हिडीओ करत असतात. पण सातत्याने रील करण्याविषयी अविनाश नारकर म्हणाले, “एकतर आम्हाला जे भावत ते करण्याचा प्रयत्न करत असतो. मी काय किंवा ऐश्वर्या काय आमचं असं म्हणणं असतं जगण्यात इतका तुटकपणा, लुसलुशीतपणा आलेला आहे. तर ते मुसमुसलेलं आणि छान टवटवीत जगणं आहे, जे अनुभवण्याचा प्रयत्न करूया. ज्या वेळेला आम्हाला रसरशीतपणा वाटतो त्यावेळेला आम्ही रील करतो. आम्ही खूप दमून येतो, तेव्हा एखादी रील करुया यार कंटाळा आला आहे, असं म्हणतो. मग दिवसभराचा कंटाळा घालवण्यासाठी अतिशय उत्तम साधन आमच्यासाठी आहे. त्यातनं इतकं ते उत्स्फूर्तपणे येत ना, तो उत्स्फुर्तपणा, तो टवटवीतपणा आहे; जो सगळ्यांना भावतो. त्यामुळे नेटकरी म्हणतात, हे असं आम्हाला जगता आलं पाहिजे.”

त्यानंतर अविनाश नारकरांना विचारलं, “तुम्ही रील्सची तयारी करता का?” यावर अभिनेते म्हणाले की, निश्चित, आम्ही रील्सची तयारी करतो. कित्येक वेळेला तुम्ही रील बघत असाल त्यात मी घामाघूम झालेला दिसतो. त्यामध्ये मग एकमेकांवर चिडणं होतं. हा असा पाय नाहीये, आधी उजवा पाय आहे. मग ती म्हणते, उजवा नाही डावा पाया आहे. बरं कोणा एकाच्या म्हणण्यांनुसार ते केलं जातं. पण, मजा येते. समजा आम्ही ११ वाजता घरी पोहोचलोय तर ११.३० वाजता जरा फ्रेश होऊन आलो की, रील करतो. कधी, कधी ११.३० ते १.३० पण वाजतो. पण तो तास, दीड तास खूप मजेत जातो.”

पुढे अविनाश नारकर म्हणाले, “जर सुट्टी असेल तर दिवसा करतो, नाहीतर मग चित्रीकरण संपवून आल्यानंतरच करतो. पण आम्हाला दोनदा आनंद मिळतो. एकतर आम्ही तो जो काळ तास-दीड तासाचा आहे तो अनुभवतो. मग त्याच्यानंतर मायबाप प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेतून आनंद मिळतो.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avinash narkar and aishwarya narkar why constantly do reel videos pps