नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. या विजयानंतर भारत एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. सामान्य लोकांपासून अनेक कलाकारांनी या विजयानिमित्त भारतीय संघाचे कौतुक केलं आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांनीही भारतीय संघाच्या या विजयानंतर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते अविनाश नारकर मराठी मनोरंजनक्षेत्रातील लोकप्रिय कलाकार आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अविनाश नारकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरबरोबर रील्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. या रिल्समुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. आता नुकताच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते भारतीय संघाच्या विजयानंतर आनंद साजरा करताना दिसत आहेत.
हेही वाचा- लग्नाला यायचं हं..! अमृता देशमुख – प्रसाद जवादेची लग्नपत्रिका पाहिली का? ‘या’ थीमवर आहे आधारित….
व्हिडीओमध्ये अविनाश नारकर त्यांच्या गाडीत बसून क्रिकेट सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. भारताचा विजय होताच ते “वोह… येस… इंडिया न्यूझीलंड बरोबरची सेमीफायनल मॅच जितली रे जितली…!” असं म्हणत ओरडताना दिसत आहेत. तसेच ते आनंदाने “इंडिया… इंडिया…” असही म्हणत आहेत. नारकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत भारतीय संघाचे कौतुक केले आहे. तर काहींनी नारकर यांच्या उत्साहाची खिल्ली उडवली आहे.
अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सध्या ते ‘सन मराठी’वरील ‘कन्यादान’ आणि ‘झी मराठी’वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मालिकांमध्ये त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे.