सध्या मराठमोळा चित्रपट ‘झिम्मा २’ची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या चित्रपटातील “मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…” या गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. सर्वसामान्यांबरोबर अनेक कलाकारांनीही या गाण्यावर रिल बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा- अमृता देशमुख-प्रसाद जवादे लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो आला समोर, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
मराठीतील लोकप्रिय नेते अविनाश नारकर यांनीही ‘झिम्मा २’ मधील ‘मराठी पोरी’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. अविनाश नारकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरबरोबर रील्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. अविनाश यांचा हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अविनाश नारकर यांनी हा नवा व्हिडीओ त्यांच्या ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरून शेअर केला आहे. अविनाश यांच्यासह या गाण्यावर ‘कन्यादान’ फेम अनिशा सबनीस व स्मिता हळदणकरही थिरकलेल्या पाहायला मिळत आहेत.
अविनाश नारकर यांच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. ‘झिम्मा २’ चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने “सुपर डुपर गोड अवि दादा आणि त्यांच्या अँजल्स” अशी कमेंट केली आहे. तर अविनाश यांच्या या व्हिडिओवर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकरांनी कमेंट करत, ‘खूप गोड’ असं म्हटलं आहे.
अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सध्या ते ‘सन मराठी’वरील ‘कन्यादान’ आणि ‘झी मराठी’वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मालिकांमध्ये त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे.