Avinash Narkar Replied To Trollers : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून अविनाश व ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक व मालिकांमध्ये काम केलेलं आहे. छोट्या पडद्यावर या जोडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काळानुसार आपण देखील बदललं पाहिजे असा विचार करून प्रेक्षकांची ही लाडकी जोडी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. इन्स्टाग्रामवरील ट्रेडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनवत हे दोघंही जबरदस्त डान्स करताना दिसतात. अनेकदा त्यांना अशावेळी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अविनाश नारकरांनी या ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या व्हिडीओवर अनेकदा नेटकऱ्यांच्या नकारात्मक कमेंट्स येतात. त्यांना वयावरून देखील ट्रोल केलं जातं या सगळ्यावर अविनाश यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. अभिनेते सांगतात, “बदल ही काळाची गरज आहे या गोष्टीशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत. तुम्ही काळानुसार बदलत गेलात तरच तुम्ही प्रवाहाबरोबर राहता आणि आपण आपल्यामध्ये वेळेनुसार बदल केले नाहीत, तर आपण प्रवाहाच्या नेहमी मागे राहतो. वयाबद्दल सांगायचं झालं तर, मी हे जगजाहीरपणे नेहमी सांगतो की, माझ्यापेक्षा ऐश्वर्या आठ वर्षांनी लहान आहे. जेव्हा जोडीदारापैकी एकजण वयाने मोठा असतो तेव्हा तो मागच्या माणसाला आपले अनुभव सांगतो.”

हेही वाचा : हनिमूनसाठी फुकेतला निघाले अक्षरा-अधिपती! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नवीन वळण, Video आला समोर

डान्स करण्यात आनंद मिळतो – अविनाश नारकर

अविनाश नारकर पुढे सांगतात, “ज्यावेळी सोशल मीडियाचा प्रभाव वाढू लागला त्यावेळी आम्ही दोघंही चर्चा करायचो. आम्ही दोघं तेव्हा बोलायचो, आपण एकत्र चित्रपट केले, नाटक, मालिका केल्या त्यामुळे आता हळुहळू सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आपण कामाची पद्धत वेगळी केली पाहिजे असं आम्ही ठरवलं. मी मुळात लालबाग-परळचा असल्याने त्यामुळे मला हे सगळं डान्स वगैरे आधीपासूनच सवय होती.”

ऐश्वर्या व अविनाश नारकर

हेही वाचा : “लग्न केवळ दोन व्यक्तींचं नसून…”, रितेश देशमुखची अनंत अंबानी व राधिका मर्चंटसाठी खास पोस्ट; म्हणाला, “तुमचे पालक…”

“आपण अशा एका माध्यमात आहोत जिथे आपल्याला आपली प्रतिमा सांभाळून सगळं करावं लागतं. हळुहळू तिने हे व्हिडीओ करण्यात पुढाकार घेतला. आम्हाला लोक म्हणतात काय वाढतं वय आणि तुम्ही थिल्लरपणा करता पण, खरं सांगायचं झालं तर, आम्ही दोघंही डान्स करण्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. तेवढाच एक आम्हाला कामातून आनंद मिळतो. रात्री घरी आलो की, आम्ही रिहर्सल करतो, त्यानंतर शूट करतो. या सगळ्याला साधारण दीड तास वगैरे जातात. पण, या दीड तासात आम्ही प्रचंड मजा करतो. आम्हाला यातून खूप आनंद मिळतो.” असं अविनाश नारकरांनी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avinash narkar shared his opinion on trolling and says wife aishwarya is 8 years younger than me sva 00