२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सहा महिने पूर्ण झाले. अशातच रामलल्लाची मूर्ती ज्या गाभाऱ्यात ठेवली आहे तिथे पहिल्या पावसातच गळती सुरु झाली आहे. याबाबत श्रीराम मंदिराचे मुख्य पूजारी महंत सत्येंद्र दास यांचं वक्तव्य समोर आलं आहे.
सत्येंद्र दास काय म्हणाले?
“जिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथेच छताला गळती लागली आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या बांधकामानंतर पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. फक्त राम मंदिराच्या गाभाऱ्यातच नाही तर मंदिराच्या इतर ठिकाणी देखील गळती होत आहे. त्यामुळे या गळतीची चौकशी होणं अपेक्षित आहे” असं सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे. यानंतर संताप व्यक्त होतो आहे. अभिनेता किरण माने यांनीही याबाबत पोस्ट लिहिली आहे आणि संताप व्यक्त केला आहे.
हे पण वाचा- NEET च्या गोंधळावर संतापले किरण माने, “देश चालवणं म्हणजे मंदिर बांधणं नाही, जमत नसेल तर…”
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
“शेतकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत देश देशोधडीला लागलेला आहेच. फण ज्या गोष्टीवर तुम्ही मतं मागितलीत ते राम मंदिरही तुम्हाला धड बांधता आलेलं नाही. एका पावसात गाभारा गळायला लागला. गाभाऱ्यातून पाणी बाहेर काढायचीही व्यवस्था नाही. लज्जास्पद आणि संतापजनक आहे हे. समस्त हिंदूंचा अपमान आहे. लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या. लायक माणूस खुर्चीवर बसवा. जय श्रीराम” असं म्हणत किरण मानेंनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. किरण माने यांनी आणखी एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये नीटच्या गोंधळावरुन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा ही पोस्ट समोर आली आहे.
नीटच्या गोंधळावर काय म्हणाले होते किरण माने?
केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात… या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे. इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएमपर्यन्त सगळे हाताशी घेऊनही जनतेनं लाथ घातल्यामुळे या हुकूमशहांचा माज ठेचला गेलाय.
एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक… NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला?? असा प्रश्न किरण मानेंनी उपस्थित केला होता.