छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिधीमा पंडीत ‘बहु हमारी रजनीकांत’ मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने रोबोट असलेल्या सुनेचं पात्र साकारलं होतं. अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी रिधीमा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रिधीमाने नुकतंच बीजांड गोठवले असल्याचा खुलासा केला आहे.
रिधीमा म्हणाली, “गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी बीजांड गोठवून(Eggs Freeze) घेतले. तेव्हा पासून मला स्वतंत्र वाटत आहे. अनेक दिवसांपासून मी या गोष्टीचा विचार करत होते. २०२२ च्या सप्टेंबरमध्ये मी बीजांड गोठवून घेतली. पुढच्या प्रोजेक्टसाठी मधल्या एक महिन्याचा अवधीदरम्यान मी ही प्रक्रिया केली. या प्रक्रियेत मी उत्तम डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतलं”.
रिधीमाच्या कुटुंबियांकडूनही यासाठी पाठींबा मिळाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. ती म्हणाली, “माझे कुटुंबीय खूप आधुनिक विचांराचे आहेत. खासकरुन माझी आई. याबाबात मी कुटुंबियांबरोबर चर्चा केली. मला उद्या लग्न करावसं वाटलं नाही, चांगला मुलगा मिळाला नाही आणि करिअर फोकस करण्याचं ठरवलं पण तरीही आई होण्याची इच्छा झाल्यास मी आधीच याची तयारी करत आहे, असं मी म्हणाले. यावर माझ्या आईने नक्की विचार कर, असा सल्ला दिला”.
हेही वाचा>> “उर्फी जावेद भाजपात गेली काय?” भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले “तिच्या कपड्यांबाबत…”
हेही वाचा>> मलायका अरोरापासून दूर जाण्याची अरबाज खानला वाटायची भीती, अभिनेत्यानेच केलेला खुलासा
“आई झाल्यानंतर मुलं आणि काम कसं सांभाळणार, हा प्रश्न नेहमीच महिलेला विचारला जातो. पण पुरुषांना याबाबत कोणीही विचारत नाही. करिअरसाठी आई होण्याचा निर्णय लांबणीवर टाकलेल्या अभिनेत्रींना दोष देणं चुकीचं आहे. बीजांड गोठवल्यामुळे लग्न लांबणीवर टाकलंय, असं नाही. सध्या मी सिंगल आहे. महिलांसाठी आई होण्याचा एक विशिष्ट वय असतं, म्हणूनच हा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे आता मला लग्न करण्याचाही ताण असणार नाही. या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या व्हाव्या, असं मला वाटतं. पण तसं नाही झालं, तरी भविष्यात मला खंत वाटणार नाही”, असंही रिधीमा म्हणाली.
रिधीमाच्या या निर्णयामुळे तिच्या मैत्रिणीही याबाबत विचार करत असल्याचं ती म्हणाली. रिधीमा खतरों के खिलाडी, हैवान या मालिकांमध्येही दिसली होती. परंतु, बहु हमारी रजनीकांत या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.