‘बालिका बधू’ फेम अभिनेत्री नेहा मर्दा नुकतीच आई झाली आहे. नेहाने ८ एप्रिलला गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नानंतर तब्बल ११ वर्षांनी नेहा व आयुष्यमान आई-बाबा झाले. लेकीच्या जन्मानंतर नेहा आईपणाचा आनंद घेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं आहे.
नेहाने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत नेहाने सार्वजनिक ठिकाणी नवजात बाळाला स्तनपान करण्याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. नेहा म्हणाली, “बाहेर जाताना बाळाला नेहमी घरातून दूध पाजून घेतलं पाहिजे. पण, जास्त वेळ बाहेर राहिल्याने जर बाळाला भूख लागली असेल, तर मी तिला उपाशी ठेवणार नाही. मी तिचं पोट भरण्याचे वेगवेगळे मार्ग स्वीकारेन. पण, बाहेर जाण्यापूर्वी तिला पोटभर दूध पाजूनच नेईन.”
“सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करण्यात काहीच चुकीचं नाही. तुम्ही कोणताही गुन्हा करत नाही आहात. ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. तुम्ही फक्त भूक लागलेल्या तुमच्या बाळाला अन्न भरवत आहात. आणि हे सामान्य आहे. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करताना तुम्ही ओढणीचा वापर करू शकता. आईला बाळाला दूध पाजताना बघणं, ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही, असं मला वाटतं,” असंही पुढे नेहा म्हणाली.
हेही वाचा>> २ हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर ‘शार्क टँक इंडिया’ फेम अनुपम मित्तलचं ट्वीट, मोदी सरकारवर टीका करत म्हणाला…
नेहाने ‘देवों के देव महादेव’, ‘डोली अरमानों की’, ‘पिया अलबेला’,’ लाल इश्क’ ‘क्यूं रिश्तों में कट्टी-बट्टी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१२मध्ये नेहा व आयुष्मान अग्रवालशी लग्नगाठ बांधली. आता ते आईबाबा झाले आहेत.