Actress Neha Marda Comeback : ‘बालिका वधू’ ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका होती. या मालिकेने प्रेक्षकांचं बरीच वर्षे मनोरंजन केलं. या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालंं. या मालिकेतील एक अभिनेत्री १३ वर्षे अभिनयापासून दूर होती. आता ती लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे.
‘बालिका वधू’मध्ये गहना नावाची भूमिका करून अभिनेत्री नेहा मर्दाला खूप लोकप्रियता मिळाली. तिने इतरही अनेक मालिका केल्या पण तिला ‘बालिका वधू’साठी विशेष ओळखलं जातं. नेहा बऱ्याच वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय नव्हती. पण आता तिने अभिनयविश्वात परतायचं ठरवलं आहे.
नेहाने ती लवकरच पुनरागमन करणार असल्याची माहिती दिली आहे. तिने सोशल मीडियावर यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती म्हणते की ती आता ऑडिशन देतेय व लवकरच अभिनयविश्वात कमबॅक करेल.
नेहाने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर तिचे चाहते खुश झाले आहेत. त्यांना बऱ्याच वर्षांनी ‘बालिका वधू’ची लाडकी पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळेल. नेहा मर्दा लग्नानंतर मुंबई सोडून पाटण्याला स्थायिक झाली होती. तिने पाटण्यातील बिझनेसमन आयुष्मान अग्रवालशी लग्न केलं आहे. आता नेहा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
लग्नानंतर १० वर्षांनी आई झाली नेहा
३९ वर्षांची नेहा लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी आई झाली. तिला आई होण्यास अनेक अडचणी आल्या होत्या. उपचार घेतल्यानंतर ती गरोदर राहिली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव अनाया आहे. नेहाची लाडकी लेक आता दोन वर्षांची झाली आहे.
मुलीच्या जन्मानंतर नेहाचं वजन खूप वाढलं होतं. तिने व्यायाम व डाएट करून तिचं वजन बरंच कमी केलं आहे. आता ती अनेक इव्हेंट्स व मनोरंजन विश्वातील पार्ट्यांना हजेरी लावतेय. तसेच ऑडिशनही देत आहे, जेणेकरून तिला पुनरागमन करण्यासाठी चांगला प्रोजेक्ट मिळू शकेल.