कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता ‘बाळूमामा’फेम अभिनेता सुमित पुसावळे (Sumeet Pusavale) आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

‘अल्ट्रा मराठी बझ’बरोबर बोलताना अभिनेत्याने आपण ते पत्र आजही जपून ठेवल्याचे वक्तव्य केल्याने तो सध्या चर्चेत आला आहे.

काय म्हणाला अभिनेता?

सुमित पुसावळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात रक्षाबंधन हा सण कसा साजरा करतो? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने म्हटले, “रक्षाबंधन हा आवडत्या सणांपैकी एक आहे, जिथे बहीण हक्काने ओवाळणी मागते. बहीण-भावाचं नातं अतूट असतं. बहीण भावाला राखी बांधते. भाऊ तिची रक्षा करणार याची जाणीव असते. हे सगळं तर आहेच, पण हा सण यासाठी आवडतो की, इतरवेळी सगळे जण आपापल्या आयुष्यात, कामात व्यग्र असतात.

कामानिमित्ताने लांब राहत असलेले बहीण-भाऊ या निमित्ताने एकत्र येतात. जसं की मी लांब राहतोय, माझ्या बहिणी घरापासून लांब राहत आहेत. या निमित्ताने आम्ही एकत्र येतो. आमच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. खूप आनंदात आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करतो”, असे सुमितने म्हटले आहे.

हेही वाचा: “अजय देवगणला अभिवादन न केल्याने चित्रपटातून काढलं,” अभिनेत्याचा मोठा दावा; निर्माते म्हणाले, “मोठ्या खोल्या, व्हॅनिटी व्हॅन…”

लहानपणी आई आपल्याला ओवाळणी देत सांगते की बहिणीला दे, पण तू तुझ्या पैशाने बहिणीला पहिली भेट काय दिली होती? या प्रश्नाला उत्तर देताना त्याने म्हटले, “लहानपणापासूनच मी माझ्या पैशानेच बहिणींना ओवाळणी देत आलेलो आहे. जेव्हा रक्षाबंधन किंवा भाऊबीज असायची त्याच्या महिनाभर आधीपासूनच त्याची तयारी सुरू व्हायची. आमची आजी बाजारात भाजीपाला, फळे विकायला जायची तेव्हा त्या मोठ्या टोकऱ्या आम्ही मंडईत घेऊन जाण्यासाठी मदत करायचो.

आजी ५० पैसे, २५ पैसै द्यायची. त्यावेळी पाच-दहा रुपयेदेखील खूप मोठी रक्कम असायची आणि ती जमवायला महिनाभर तरी जायचा. जसे मोठा झालो, कमावता झालो तेव्हा माझ्या लहान बहिणीला मी हातातील घड्याळ दिलं होतं आणि तिच्यापेक्षा मोठ्या बहिणीला, गौरीला कानातले दिले होते.”पुढे सुमितने म्हटले आहे की, मला हे सांगताना कधीच लाज वाटत नाही, माझ्या संघर्षाच्या काळात माझ्यापेक्षा लहान असलेल्या बहिणीने गौरीने मला सांभाळले आहे.

हेही वाचा: “अजय देवगणला अभिवादन न केल्याने चित्रपटातून काढलं,” अभिनेत्याचा मोठा दावा; निर्माते म्हणाले, “मोठ्या खोल्या, व्हॅनिटी व्हॅन…”

याबरोबरच, मला माझी मोठी चुलत बहीण विद्याताई दरवर्षी गावाकडे राखी पाठवायची, पत्र पाठवायची. मी सातवी-आठवीला असताना तिने मला एकदा बहीण भावाला राखी बांधत असल्याचं चित्र वगैरे काढून पाठवलेलं, ते पत्र माझ्याकडे आजही आहे. त्यावेळी त्या पत्र येण्याची आम्ही वाट बघायचो. जशी बाप्पा येण्याची आतुरता असते, त्यावेळी तशी रक्षाबंधनची आतुरता असायची, अशी आठवण सुमितने सांगितली आहे.दरम्यान, अभिनेता सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.