युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्याने तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अद्यापही त्याने विचारलेल्या प्रश्नामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. रणवीरने समय रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला अक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. आता हा प्रश्न त्याने स्वत: बनवलेला नसून त्याने तो कॉपी केल्याचं समोर आलं आहे. तब्बल १० वर्षांपूर्वीदेखील एका कार्यक्रमात असाच प्रश्न बॉलीवूड कलाकारांना विचारण्यात आला होता.
१० वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलिब या दोघांना रणवीर अलाहाबादिया याने जो प्रश्न विचारला आहे, तोच विचारण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विनोदी अभिनेता कनन गिल याच्या एका शोमध्ये त्यानेच हा प्रश्न विचारला आहे.
साल २०१५ मध्ये अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलिब या दोघांचा ‘वेलकम २ कराची’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघेही कनन गिलच्या शोमध्ये आले होते. त्यावेळी कननने त्याच्या फोनमध्ये पाहून रणवीर अलाहाबादियाने विचारलेला आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याचा हा प्रश्न ऐकून दोन्ही कलाकारांना धक्का बसला होता. त्यांना काय उत्तर द्यावे हे समजत नव्हते. लॉरेन गॉटलिबने या प्रश्नावर लगेचच उत्तर देत, “हे फार विचित्र आहे,” असं म्हटलं होतं.
कननने विचारलेल्या या आक्षेपार्ह प्रश्नाचा व्हिडीओ आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. नेटकऱ्यांनीही पुन्हा एकदा या प्रश्नावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अच्छा, म्हणजे २०२५ पेक्षा २०१५ मध्ये आम्ही फार शांत होतो.” तर आणखी एकाने “रणवीर अलाहाबादियाने केलेल्या या वक्तव्याची तुलना त्याच्या आधीच्या कामाशी करू नये आणि त्याला माफ करू नये,” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कार्यक्रमातही विचारला होता ‘हा’ प्रश्न
ज्या प्रश्नाने रणवीर अलाहाबादिया अडचणीत आला, तो वादग्रस्त प्रश्न याआधी ऑस्ट्रेलियाच्या कार्यक्रमातही विचारण्यात आला होता. ‘ट्रुथ ऑफ ड्रिंक’ असं त्या शोचं नाव होतं. सॅमी वाल्श हा कार्यक्रम होस्ट करत होती. या महिलेने आक्षेपार्ह प्रश्न कॉमेडियन एलन फांगला विचारला होता. त्यांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.