Shubhangi Atre ex Husband Passed Away : ‘भाभी जी घर पर हैं’ फेम मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिचा पूर्वाश्रमीचा पती पियुष पुरे याचे निधन झाले आहे. पियुष मागील काही दिवसांपासून आजारी होता. घटस्फोटानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी पियुषचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने त्याच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.

शुभांगी व पियुष यांनी २००३ मध्ये लग्न केलं होतं. २२ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी नुकताच घटस्फोट घेतला. या दोघांना आशी नावाची एक मुलगी आहे. शुभांगी व पियुष यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून कटुता आली होती, मात्र या दोघांनी मुलीसाठी घटस्फोट पुढे ढकलला होता. अखेर या वर्षी फेब्रुवारीमध्ये शुभांगी व पियुष वेगळे झाले आणि आता पियुषच्या निधनाची बातमी आली आहे.

पियूष पुरे यांचे शनिवारी लिव्हर सिरोसिसमुळे निधन झाले. निधनापूर्वी काही काळ आजारी होते. इ-टाइम्सने यासंदर्भात शुभांगीशी संपर्क साधला. “या कठीण काळात तुम्ही विचारपूस केलीत, पण मी तुम्हाला विनंती करते की याविषयी बोलण्यासाठी मला थोडा वेळ द्या,” असं शुभांगी म्हणाली.

शुभांगी आणि पियुष एकमेकांशी बोलत नव्हते, पण ती त्याच्या निधनाने दुःखी आहे. तिने रविवारी ‘भाबीजी घर पर है’ या मालिकेचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे, अशी माहितीही समोर आली आहे. पियुषबद्दल बोलायचं झाल्यास तो मार्केटिंग प्रोफेशनल होता.

घटस्फोटाबद्दल काय म्हणाली होती शुभांगी?

शुभांगीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. “हे खूप त्रासदायक आहे. कारण मी या नात्यात पूर्णपणे गुंतले होते. काही वर्षांनंतर माझ्यात आणि पियुषमध्ये खूप बदल होऊ लागले, पण आता मी या नात्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे आता मला खूप हलकं वाटत आहे. माझ्यावरील एक ओझं दूर झालं आहे. मला स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्या भावना मी व्यक्त करू शकत नाही. आता मला माझी मुलगी आशीवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे, जेणेकरून ती तिच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहील,” असं शुभांगी म्हणाली होती.

घटस्फोटानंतर शुभांगीने मुलगी आशीची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. त्यासाठी तिने पती किंवा पतीच्या कुटुंबाकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नव्हती.