मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकारांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे, संजय जाधवांची लेक, महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर, निरंजन कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी त्यांचे नवीन कॅफे व हॉटेलचं उद्घाटन केलं. यामध्ये आता ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलचं नाव जोडलं गेलं आहे.
हेही वाचा : …म्हणून हॉटेलचं ‘वदनी कवळ’ असं नाव ठेवलं! भगरे गुरूजींच्या लेकीने सांगितलं कारण, म्हणाली…
अनघाने १९ ऑक्टोबरला पुण्यात तिचं ‘वदनी कवळ’ हे नवीन हॉटेल सुरू केलं. या हॉटेलची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने या हॉटेलमध्ये केलेल्या पारंपरिक इंटिरियरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. मराठी मनोरंजन वाहिनीशी संवाद साधताना अनघा म्हणाली, “हॉटेलमध्ये इंटिरियर करायचं ही माझी मनापासून इच्छा होती. परंतु, इंटिरियरवर खर्च करण्याची माझा भाऊ आणि बाबांची अजिबात इच्छा नव्हती. मी खूप प्रयत्न करून हे काम करून घेतलं.”
अनघा पुढे म्हणाली, “मी त्यांच्या मागे लागून त्यांना इंटिरियरबद्दल सांगितलं. माझ्या पद्धतीने मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि आता हे इंटिरियर सर्वांना आवडलं आहे. आमच्या हॉटेलच्या चवीबद्दल जेवढं बोललं जातं…तेवढंच इंटिरियरबद्दल बोललं जात आहे. माझ्या मैत्रिणीच्या मदतीने हे सुंदर इंटिरियर मला करता आलं.”
हेही वाचा : रश्मिकानंतर कतरिना कैफचा डीपफेक फोटो व्हायरल, ‘टायगर ३’ मधील टॉवेल सीन केला मॉर्फ
दरम्यान, अभिनेत्रीने हॉटेलमधील एका भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘वदनी कवळ घेता नाम घेता श्रीहरीचे…’ हा श्लोक लिहून घेतला आहे. याशिवाय दुसऱ्या एका भिंतीवर अनघाने पुणे शहराचे जुने विंटेज व कुटुंबीयांचे फोटो लावले आहेत. हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी तिने पितळेची जुनी भांडी शोभेसाठी ठेवली आहेत. या भांड्यांमुळे तिच्या संपूर्ण हॉटेलला एक मराठमोळा लूक मिळाला आहे. या सगळ्यात तिच्या हॉटेलच्या नेमप्लेटने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं होतं.