मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर नेहमीच चर्चेत असते. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून ती घराघरांत पोहोंचली. या मालिकेत तिने साकारलेल्या ‘सानिया’ हे पात्र चांगलंच लोकप्रिय झालं आहे. जान्हवी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करीत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. खऱ्या आयुष्यात जान्हवीनं अनेक कठीण समस्यांचा सामना केला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवीनं तिच्या लहानपणीचा एक भयानक प्रसंग सांगितला आहे.
हेही वाचा- “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
जान्हवीनं नुकतीच ‘स्टार मीडिया मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांबाबत भाष्य केलं आहे. यावेळी जान्हवीनं तिच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. जान्हवी म्हणाली, “माझ्या मोठ्या जान्हवी म्हणाली, “माझ्या मोठ्या बहिणीला पेणच्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्या कॉलेजला जायला एक टेकडी होती. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. माझी आई व बहीण दोघीच पुढे कॉलेजमध्ये गेल्या आणि मी व माझ्या भावाला त्यांनी टेकडीखाली एक पत्र्याची शेड होती तिथे उभं केलं होतं. माझा भाऊ पाच-सहा वर्षांचा होता आणि मी त्या वेळेस १२-१३ वर्षांची होते. खूप वेळ होऊनही त्या दोघी आल्या नाहीत म्हणून त्यांना बघण्यासाठी मी भरपावसात छोट्या भावाला घेऊन त्या कॉलेजमध्ये गेले; पण तिथेही त्या दिसल्या नाहीत. मला वाटलं खाली त्या आमची वाट बघत असतील म्हणून आम्ही दोघं परत खाली यायला निघालो.”
जान्हवी पुढे म्हणाली, “रस्त्यात बाजूला चार-पाच माणसं दारू पीत बसली होती. मी आणि माझा भाऊ चालत असताना माझ्या लक्षात आलं की, ती माणसं माझा पाठलाग करीत आहेत. मी एकटी असते, तर मी धावले असते; पण माझ्याबरोबर माझा लहान भाऊही होता. तिथे माझ्यावर बलात्कारही होऊ शकला असता. मी माझ्या भावाबरोबर धावत होते; पण नंतर नंतर त्याला धावता येत नव्हतं. शेवटी मी त्याला उचललं आणि धावत सुटले. धावत मी खाली वर्दळीच्या ठिकाणी गेले. तिथे एक वडापाव विकणाऱ्या काकांची गाडी होती. मी त्यांच्याकडे मदत मागितली. काकांना बघून ते गुंड पळून गेले. आजही तो प्रसंग आठवला की, माझ्या अंगावर काटा येतो.”
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर याअगोदर तिनं श्री स्वामी समर्थ या मालिकेत काम केलं आहे. सध्या ती ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत जान्हवी किल्लेकरबरोबर तन्वी मुंडले, विवेक सांगळे, निवेदिता सराफ, अमित रेखी, पूर्वा फडके, सौरभी भावे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.