छोट्या पडद्यावरील कलाकार अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय होतात. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०२२ मध्ये ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील राज-कावेरीच्या जोडीने सर्वत्र अधिराज्य गाजवलं होतं. तर, या मालिकेत अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सानिया हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. नकारात्मक पात्र असलं तरी देखील जान्हवी प्रेक्षकांची आवडती झाली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या मालिकेतील सगळेच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. सध्या जान्हवीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी अभिनेत्रीच्या घरच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. अचानक चोरी झाल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे. तिची आई देखील रुग्णालयात उपचार घेत असल्याचं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…

हेही वाचा : Video : परदेशात अनवाणी फिरतेय देशमुखांची सून, जिनिलीयाच्या न्यूयॉर्कमधील व्हिडीओने वेधलं लक्ष

जान्हवी किल्लेकर सांगते, “नमस्कार, आज अचानक व्हिडीओ बनवण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे माझ्या बहुतेक चाहत्यांना आता माहितीये की, माझं पेणमध्ये एक घर आहे. लहानसा असा बंगला आम्ही अलीकडेच त्याठिकाणी बांधलाय. ते आमचं वीकेंड होम असून आम्ही फक्त शनिवार – रविवारी त्या घरी जातो. माझे आई – बाबा देखील वीकेंडला आमच्याबरोबर येतात. झालं असं की, या घरात नुकतीच चोरी झाली.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आमच्या घरातून चोरांनी बऱ्याच मौल्यवान वस्तू जसं की स्पिकर्स, माझ्या भावाची गिटार, महागडी घड्याळं, माझ्या आईच्या साड्या अशा बऱ्याच वस्तू गेल्या. त्या चोरांना जे नेणं शक्य झालं ते चोरून घेऊन गेले. एवढंच नव्हे तर या चोरांनी एसी काढण्याचा पण प्रयत्न केला. पण, कदाचित त्यांना ते जमलं नसेल. जर तुमचंही असं बंद घर असेल किंवा कुठे असं वीकेंड होम असेल तर, प्लीज काळजी घ्या. सध्या चोरांचा खूपच सुळसुळाट झाला आहे. आपण अनेकदा खूप आवडीने गोष्टी घेतो. पण, आमच्या घरच्या अशाच काही खास वस्तू चोर घेऊन गेले. पेणचे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत. पण, चोर सापडतील की नाही याची शाश्वती नाही. याचं कारण म्हणजे आम्ही फक्त वीकेंडला तिथे जातो त्यामुळे नेमकी चोरी कोणत्या दिवशी झाली याची आम्हाला कल्पना नाही. माझ्या आईने या सगळ्या गोष्टींचं दडपण घेतल्यामुळे तिला अर्धांगवायूचा अटॅक (पॅरालिसिस) आला. अजूनही ती रुग्णालयात आहे. त्यामुळे तुमचंही असं बाहेर कुठे घर असेल तर काळजी घ्या.”

हेही वाचा : अंबानींचा थाट! लग्नपत्रिकेसह भेट दिली काश्मीरची ‘दोरुखा पश्मिना शाल’; काय आहेत वैशिष्ट्ये, किंमत किती?

“आपण सर्वांनी सतर्क व जागरूक राहण्याची गरज आहे. हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा” असं अभिनेत्रीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. जान्हवीच्या या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. “सर्वात आधी सीसीटीव्ही लावून घ्या”, “टेन्शन घेऊ नका जेवढं गेलं आहे त्यापेक्षा दहापट मिळेल तुम्हाला हीच ईश्वरचरणी प्रार्थना…”, “काळजी घ्या मॅम स्वतःची आणि आईंची भेटतील चोर लवकरच”, “पेण – पनवेलमध्ये हल्ली खूप चोऱ्या होत आहेत…” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी जान्हवीला या कठीण प्रसंगात पाठिंबा दिला आहे.