‘सायकल’ या २०१८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले(Tanvi Mundle) होय. ‘पाहिले ना मी तुला’ या मालिकेतून तन्वी घराघरांत पोहोचली. या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच अभिनेत्री ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करताना दिसली होती. आता एका मुलाखतीत तन्वीने तिच्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री तन्वी मुंडलेने नुकताच ‘लोकमत फिल्मी’बरोबर संवाद साधला. त्यावेळी अभिनेत्रीने वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या. तन्वीने म्हटले, “तीन वर्षे झाली, मी तो कप्पा उघडतच नाही. मी त्याला ए बाबाच म्हणायचे. आबू म्हणायचे. माझा जवळचा मित्र होता. तो असता तर आयुष्य खूप वेगळं असतं. माझ्या आयुष्याला पूर्णत्व होतं, जे की आता नाहीये. मला माहितेय, आता जेव्हा काहीतरी ओळख मिळतेय तर त्याची कॉलर किती ताठ असती. या क्षेत्रात काम करण्यासाठी त्याने एकट्याने मला खूप पाठिंबा दिला होता. त्याचा विश्वास होता की ही मुलगी करून दाखवणार. ती तिची ओळख निर्माण करणार आणि मला ओळख मिळवून देणार. आज ते कुठेतरी होतंय तर तो या जगात नाहीये.”
पुढे बोलताना तन्वीने म्हटले, “बाबाला अरे-तुरे करणं हे आमच्या खानदानात कोणी केलं नाहीये. कुडाळसारख्या ठिकाणची मी मुलगी आहे. जशी मी थोडी मोठी होत होते, तर काही नातेवाईक वडिलांना म्हणायचे की, अरे तुला अरेच म्हणते, लहान होती तेव्हा ठीक होतं; आता तिने अहो-जाहो म्हटलं पाहिजे. पण, माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला माहितेय तुमचं कनेक्शन काय आहे. माझ्या बाबाने मला तेव्हाच सांगितलं की असं काही नाही, तू माझी लाडकी आहेस. तुला माहितेय की आपलं कनेक्शन काय आहे. तू मला आबू म्हणतेस, तू आबूच म्हण. मी तुझा आबूच आहे. तू मला कधी बाबा म्हणू नको. हे नातं फ्रेंडशिपच्याही पलीकडचं आहे. वडील मुलीला खूप जास्त समजू शकतात आणि त्यांना सांगायलाच लागत नाही. त्यांना त्या गोष्टी कळून जातात. आम्ही प्रत्येक आठवड्याच्या शेवटी लाँग ड्राइव्हला जायचो. दादाचं आणि त्याचं एवढं नव्हतं, पण माझं आणि त्याचं खूप चांगलं बॉण्डिंग होतं.”
करिअरबाबत वडिलांनी दिलेल्या सल्ल्याबाबत अभिनेत्रीने म्हटले, “मी खूप लहान होते आणि जेव्हा मी थिएटरमध्ये मास्टर करण्याचा निर्णय घेतला आणि व्यावसायिकदृष्ट्या या क्षेत्राकडे बघायचं ठरवलं, त्यावेळी त्याने मला एक गोष्ट सांगितली होती. बाबा म्हणालेला की, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचा तुला पूर्ण पाठिंबा असेल. फक्त तो टिकवून ठेव. हे खूप असतं. कळणाऱ्याला हे व्यवस्थित कळतं की आपल्याला कुठल्या मार्गाला जायचं आहे आणि काय करायचंय. आपल्याला आयुष्यात काय करायचं नाहीये, त्यामुळे कधी कधी होतं असं की, या क्षेत्राच्या निमित्ताने इतकी माणसं भेटत आहेत. सतत कोणाला ना कोणाला भेटणं होतं. बरीच अशी माणसं आहेत, वयाने मोठी आहेत. ज्यांच्याशी माझं कनेक्शन खूप चांगलं आहे आणि ते म्हणतात की तू माझ्या मानलेल्या मुलीसारखी आहेस, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. पण, ती जागा असते ना ती कधी कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे किती जरी झालं तरी त्या व्यक्तींना मी काका किंवा दादाच म्हणेन, कारण प्रत्येकासाठी ती व्यक्ती असते आणि माझ्यासाठी माझे वडील होते”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्री नुकतीच माएरी (Maeri) या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसली आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.